पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचा लग्नाचा वाढदिवस जेजुरीमध्ये खंडोबाचे दर्शन घेऊन साजरा केला. यावेळी त्यांनी पती सदानंद सुळे यांच्यासोबत प्रसिद्ध पाचपावली प्रथेचे अनुसरण करण्याचाही प्रयत्न केला.
जेजुरीच्या खंडोबाला आज महाशिवरात्रीनिमित्त मोठी गर्दी असते. शिवाय इथे पहिल्यांदा एकत्र येणाऱ्या जोडप्यातील नवऱ्याने बायकोला पाच पायऱ्या उचलून घेण्याच्या प्रथेला पाच पावली म्हटले जाते. विशेषतः नवविवाहित जोडप्यांकडून ही प्रथा आवर्जून पार पाडली जाते. सदानंद सुळे यांनीही सुप्रिया यांना उचलण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यात त्यांनी पूर्ण पाच पायऱ्या मात्र उचललेले नसल्याचे त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओतून स्पष्ट होते. मात्र दोघांनीही ही प्रथा मनापासून एन्जॉय केल्याचे दिसत आहे.
सुप्रिया आणि सदानंद सुळे यांचे १९९१ साली लग्न झाले असून त्यांनी रेवती आणि विजय अशी दोन मुले आहेत. सुळे यांची राजकीय कारकीर्द २००६साली राज्यसभा सदस्य म्हणून सुरु झाली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे काम केले. सध्या त्या बारामती लोकसभा मतदार संघातून प्रतिनिधीत्व करतात.