पुणे : तळोजा तुरुंगातून सुटल्यानंतर, गजा मारणेची काढलेल्या रॅलीची व्हिडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या गुंडावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करुन त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे.
संतोष पांडुरंग तोंडे (वय ३८, रा. सुतारदरा, कोथरूड, सध्या खेचरे, ता. मुळशी) असे या गुंडाचे नाव आहे.
संतोष तोंडे याने साथीदारांसह कोथरूड, हडपसर, तळेगाव दाभाडे, पोलीस ठाण्यात तसेच पुणे शहरात दुखापत, दरोडा तयारी, दंगा, खंडणी, वाहनांची तोडफोड, जबरी चोरी, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील १५ वर्षांमध्ये त्याच्याविरुद्ध ८ गुन्हे दाखल आहेत.
गजा मारणे हा तळोजा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संतोष तोंडे याने इतर २०० ते ३०० साथीदारांसह वाहनांच्या ताफ्यातून मुंबई -पुणे एक्सप्रेस वे पूर्ण ब्लॉक करून रॅली काढली होती. मुळशी पॅटर्न चित्रपटामधील डायलॉगची क्लिप तयार करून आला रे आला, तुमचा बाप आला अशा मजकुराची घोषणा असलेली क्लिप व्हायरल करून जनतेत दहशत निर्माण केली होती. कोथरूडचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे व महेंद्र जगताप यांनी एमपीडीए कायद्यान्वये गुन्हेगारांस स्थानबद्ध करण्याकामी प्रस्ताव तयार करून तो पोलीस आयुक्त गुप्ता यांना सादर केला होता. अमिताभ गुप्ता यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून तोंडे याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गेल्या १० महिन्यात ३६ गुन्हेगारांवर एमपीडीए कायदयान्वये स्थानबद्ध केले आहे.