पुणे : ‘महापालिकेत बदमाशी सुरू आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च दरवर्षी दुरुस्तीसाठी केला जातो. तरीही यांच्या जलवाहिन्या बिघडतात कशा?’ असा सवाल करून भारतीय जनता पार्टीचे खासदार शिरोळे यांनी महापालिकेतील स्वपक्षाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले. काहीजण पळून जातात; पण मी नागरिकांच्या तक्रारींना वाचा फोडतो. महापौर मुक्ता टिळक यांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित केले असे ते म्हणाले.शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर खासदार शिरोळे यांनी शनिवारी सकाळी महापालिकेच्या प्रवेशद्वारात उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर हे उपोषण महापौरांनी आश्वासन दिल्यामुळे स्थगित करण्यात आले. याबाबत खासदार शिरोळे यांना विचारले असता त्यांनी महापालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.कालवा समितीच्या बैठकीत ठरले आहे त्याप्रमाणे पुण्याच्या एकूण लोकसंख्येला पाणी द्यायचे प्रशासनाचे काम आहे. त्यात अडथळे येत असतील तर त्यावर त्यांनीच उपाययोजना करायची आहे, असे खासदार शिरोळे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘सलग पाच तास पाणी द्यायचा निर्णय झाला. मात्र तो निर्णय झाला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून माझ्याकडे नागरिकांच्या तक्रारींचा ओघ सुरू आहे. त्याबाबत आयुक्तांबरोबर बोललो. त्यांनी पाणी कोणत्या भागाला मिळत नाही त्याची माहिती घेतली व तिथे पाणी मिळेल असे सांगितले.’’त्याप्रमाणे रेव्हेन्यू कॉलनी, वाडेकर बंगला, केंजळे बंगला, दत्त वसाहत १३०२ या भागाला शुक्रवारी रात्री पाणी मिळणे आवश्यक होते, असे सांगून शिरोळे म्हणाले, 'त्यांना सायंकाळी ५ ते रात्री ९ अशी वेळ दिली होती; मात्र रात्री ९ पर्यंत पाणी आले नाही. त्यामुळे त्या भागातील नागरिक भेटायला आले. त्यांच्या तक्रारीची दखल घ्यायची म्हणून महापालिकेच्या आयुक्तांसह पाणीपुरवठ्याच्या वरिष्ठ अधिकाºयांनाही फोन केले, कोणीही फोन घेतला नाही. उपोषणाचा इशारा दिल्यानंतर त्यांना जाग आली. रविवारी बैठक ठरली आहे. त्यात निर्णय होईल.'पाणीपुरवठा विभागाचे फक्त दुरुस्तीचे वार्षिक बजेट कोट्यवधी रुपयांचे आहे. आयएएस दर्जाचे पाईप घेतले तर ते फुटायचे कारण नाही; पण यांच्या पाईपमध्ये हवा धरली जाते, ते फुटतात व पाणीपुरवठा विस्कळीत होतो, तो नीट करायचा म्हणून पुन्हा दुरुस्ती केली जाते.
पुणे पालिकेत ‘बदमाशी’ सुरू; भाजपा खासदार अनिल शिरोळेंकडून स्वपक्षाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 3:13 AM