पुणे : एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी पुण्यातील शास्त्री रस्त्यावर केलेल्या अघोषित आंदोलनाचे नेते बनलेले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह वीस ते पंचवीस जणांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर देखील पडळकर यांनी आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करून पडळकर, विक्रांत पाटील, पुनीत जोशी, प्रदीप देसरडा, लक्षण हाके, अभिजित राऊत, संतोष कांबळे, धीरज घाटे यांच्यासह नऊ जणांना रात्री ताब्यात घेतले होते. याप्रकरणात पडळकर यांच्यासह एकूण वीस ते पंचवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली.
नियोजित एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलने केली होती. या आंदोलनाची सुरुवात पुण्यापासून झाली. त्याच वेळी या आंदोलनाला पाठिंबा देत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनस्थळी हजेरी लावली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला विरोध करत पडळकर यांनी आजची रात्र रस्त्यावरच काढणार असल्याची घोषणा केली.अनेकदा पोलिसांनी देखील विनंती करून पडळकर हे आंदोलन स्थळ सोडत नाही ते लक्षात आल्यानंतर,शेवटी पडळकर यांना रात्री उशीरा विश्रामबाग पोलिस ठाण्यात उचलून नेले. त्यानंतर तेथे त्यांच्यावर व त्याच्या साथीदारांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.