पुणे : राज्य लाेकसेवा आयाेगाने नुकतेच ‘एमपीएससी’ नावाचे फेज - २ चे ॲप लाँच केले आहे. मात्र, त्यामध्ये विविध त्रुटी असून त्या दूर करणे गरजेचे आहे. तसेच त्यामध्ये अडचणी मांडण्याची सुविधा देण्यात यावी यासह विविध मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
या ॲपमध्ये उमेदवारांना फॉर्म व फी भरता आली पाहिजे. कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करता यायला हवी. उमेदवारांना ज्या अडचणी येतात त्या ॲपमधूनच मांडता यायला हव्यात. तसेच त्याला टिकीट नंबर उपलब्ध होऊन त्याला ट्रॅक देखील करता आले पाहिजे, अशी मागणी केली आहे.
माहिती व तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग मागील काही दिवसापासून चांगले बदल हे घडवून आणत आहे. आणि त्यातच आज हे ॲप विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी आयोगाने सादर केले आहे.
या ॲपमध्ये उमेदवारांची समस्या किंवा अडचणीचे निरासन हे २ ते ८ दिवसात झाले पाहिजे. बऱ्याच मेलला आयोगाकडून कोणतेही उत्तर मिळत नाही किंवा ती समस्या सोडविली आहे, याची माहिती उमेदवारांना मिळत नाही. तसेच आयोगाने कॉल सेंटरचा जो नंबर दिला आहे त्याला देखील हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने उमेदवारांना योग्य माहिती मिळत नाही. त्यामुळे उमेदवारांचे नुकसान झाले आहे. काही उमेदवारांना तर परीक्षेस मुकावे लागले आहे. आयोग आपल्या कामकाजात अधिक माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करत आहे तर या ॲपमध्ये देखील फेज २ मध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आवश्यक गोष्टींचा समावेश करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.