पुणे : पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. हे आंदोलन राज्यसेवा मुख्य वर्णनात्मक न घेता एमसीक्यू पद्धतीने घ्यावी अशी मागणी होती. गेल्या तीन दिवसांपासून हे विद्यार्थी पुण्यात जे एम रस्त्यावर बालगंधर्व रंगमंदिराजवळ आंदोलन करत होते. आता परीक्षा पद्धतीमधील बदल २०२५ पासून लागू होणार आहे.
परीक्षेतील बदल २०२३ पासून लागू न होता ते २०२५ या वर्षापासून लागू होणार आहेत. याबद्दलचे नोटिफिकेशन आयोगाने काढले आहे. या नोटिसमध्ये म्हटले आहे की, परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून राज्यसेवा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक झाले होते. या आंदोलनाला विविध राजकीय पक्षातील नेते, आमदारांनी भेटी दिल्या होत्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही विद्यार्थ्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत होते. आज अखेर राज्यसेवा आयोगाकडून याबद्दलचे परिपत्रक काढण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनस्थळी मोठा जल्लोष केला.