पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) राज्यसेवा परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेतून पदांवर निवड करताना मुलाखतीपूर्वी पदासाठी पसंती दर्शवावी लागते. गुणांनुसार त्या पदासाठी निवड केली जाते. मात्र, जाहिरातीमध्ये अपेक्षित पद नसल्याने ज्या उमेदवाराने पसंती क्रम दर्शविला नाही, तर इतर उमेदवाराला निवडीची संधी मिळते. यावर एमपीएससीने नवीन आदेश काढून पसंती क्रम दिला नसला तरी जाहिरातीत दिलेल्या पदानुसार निवड केली जाईल, असे सांगितले आहे. या निर्णयाने ज्या उमेदवाराची पद घेण्याची इच्छा नसतानादेखील त्याची निवड होऊन इतर उमेदवाराची संधी हुकणार आहे. असे उमेदवरांचे म्हणणे असून हा निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
राज्यसेवा २०१९ ची भरती प्रक्रियेमध्ये एमपीएससीकडून पुन्हा एकदा गोंधळ निर्माण घातला जात आहे. शासनाच्या १५ जुलैच्या अध्यादेशानुसार एमपीएससी नव्याने मुलाखती घेताना १२ ॲागस्ट रोजी प्रसिद्धीपत्रक काढले, त्यानुसार जे उमेदवार पसंती क्रम भरणार नाहीत त्यांचा अंतिम शिफारशीसाठी विचार करणार नाही, असे सांगण्यात आले होते. २०१९ मध्ये बरेच उमेदवार अगोदरच शासकीय सेवेत गट अ आणि गट ब पदांवर रुजू आहेत. त्यामुळे त्यांनी ४० ते ५० उमेदवारांचे नुकसान टाळण्यासाठी पसंती क्रम दर्शविला नाही. ज्या पदासाठी ज्यांनी पसंतीक्रम भरले नाहीत, त्यातील बरेच उमेदवार हे ते अगोदरच त्या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे पसंती क्रम दर्शविला किंवा नाही दर्शविला तरी एमपीएससी आता जाहिरातीत दिलेल्या पदांच्या क्रमानुसार निकाल लावणार आहे. एमपीएससीने १२ ॲागस्टचा नियम ८ सप्टेंबर २०२१ च्या घोषणापत्रानुसार बदलला. त्यामुळे जवळपास ४० ते ५० उमेदवारांचे नुकसान होऊन ती पदे वाया जातील. ज्यांची इच्छा नाही किंवा त्यांना पद नकोच आहे, अशा उमेदवारांचा अंतिम शिफाशीसाठी विचार करण्यात येऊ नये. त्याऐवजी इतर उमेदवारांचा विचार करून त्यांना संधी द्यावी. एमपीएससीने नव्याने घोषणापत्रकामध्ये बदल करून ज्यांनी पसंती दर्शविली नाही, फक्त त्यांच्याकडूनच पसंती मागवून घ्यावी. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करावा, अशी मागणी उमेदवरांची आहे.
-----------------
ज्या पदावर सध्या कार्यरत आहे किंवा जे पद आधीच्या परीक्षेतून मिळाले आहे. त्याच पदावर पुन्हा निवड होऊ नये किंवा त्याखालील पद मिळू नये म्हणून पसंती क्रम दिला नाही. जर पसंती क्रम दिला तर नक्कीच जाहिरातीत दिलेल्या पदावर निवड होईल. जे की त्या पदावर रुजू होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या उमेदवारांना मिळणारी संधी हुकेल. सामाजिक भावनेतून असा निर्णय अनेक नव्याने निवड झालेल्या उमेदवारांनी घेतला आहे.
- महेश पांढरे (नवनियुक्त गट विकास अधिकारी)