पुणे : राज्यसेवा दुय्यम सेवा गट ‘ब‘ पूर्वपरीक्षेच्या एकाच पेपरमधील तब्बल आठ प्रश्न रद्द, तर तीन प्रश्नांची उत्तरेच बदलली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) या ढिसाळ कारभाराचा राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. काही दिवसांपूर्वी राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये एमपीएससीने बदल केले होते. पूर्व परीक्षेत असणारा पेपर क्रमांक २ (सीसॅट पेपर) क्वालिफाईंग केला होता. त्यानंतर राज्यभरातून विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले होते. मात्र, काही दिवसांतच आयोगाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्याचा फटका मात्र हजारो विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थी न्यायालयाचे दार ठोठावण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षा कालावधी पुन्हा लांबण्याची शक्यता विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
शुक्रवारी (दि. ६) महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) संयुक्त (पूर्व) स्पर्धा परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या अंतिम उत्तरतालिकेनुसार या परीक्षेतील ८ प्रश्न रद्द करण्यात आले आहेत तर ३ प्रश्नांची उत्तरे बदलण्यात आली आहेत. यामुळे ११ प्रश्नांवर परिणाम झाला आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षेत १०० प्रश्न होते. प्रत्येकी प्रश्नाला १ गुण असतो. चिंताजनक बाब म्हणजे आता अंतिम उत्तरतालिकेनंतर ११ प्रश्नांवर परिणाम झाला आहे. या परीक्षेतील ८ टक्के प्रश्न चुकीचे आणि ३ टक्के प्रश्नांची उत्तरे बदलली आहे. त्यामुळे या परीक्षेतील तब्बल ११ टक्के प्रश्नांवर परिणाम झाला आहे.
एवढी मोठी यंत्रणा असताना जर ८ प्रश्न चुकीचे आणि तीन प्रश्नांची उत्तरे बदलली जात असतील तर आम्ही कसा अभ्यास करायचा, अशी प्रतिक्रिया अंतिम उत्तरतालिकेनंतर एका परिक्षार्थींने व्यक्त केली आहे. दुसरा परीक्षार्थी म्हणाला, पहिल्या उत्तरतालिकेनंतर माझे गुण चांगले आले होते. त्यावेळी मी अभ्यास सुरू केला. पण आता आयोगाच्या अशा पद्धतीच्या कामामुळे अभ्यासाची मानसिकताच होत नाही.
एमपीएससीचा ढिसाळ कारभार थांबता थांबेना-
सन २०२0-२१ मधील विविध परीक्षा/रद्द केलेल्या प्रश्नांची संख्या-
- राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०/ ४ प्रश्न रद्द केले
- राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१/ ८ प्रश्न रद्द केले
- राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२०/२३ प्रश्न रद्द केले
- संयुक्त गट ‘ब‘ पूर्व परीक्षा २०२०/ ५ प्रश्न रद्द केले
- एएमव्हीआय मुख्य परीक्षा २०२०/ ५ प्रश्न रद्द केले
- स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा/ ७ प्रश्न रद्द केले
- संयुक्त गट ‘ब‘ पूर्व २०२१/८ प्रश्न रद्द केले