प्रमोद सरवळे
पुणे : अधिकारी झाल्याचा गावभर बोभाटा केला. सत्कारही स्वीकारले. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे खोटे पत्र तयार केल्याचे उघडकीस आले आहे. लोकसेवा आयोगाकडून याप्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातील तरुण आणि नगर जिल्ह्यातील तरुणीवर कारवाई करण्याच येणार आहे.
जालन्यातील एका तरुणाने दुकानावर काम करून अभ्यास करत राज्य विक्रीकर उपायुक्त पदी निवड झाल्याचे गावभर सांगितले आहे. सोशल मीडियावरूनही त्यांनी ही माहिती दिली होती. अहमदनगर जिल्ह्यातील एका तरुणीनेही उपजिल्हाधिकारी झाल्याचे खोटे पत्र तयार करून सत्कार सोहळे करून घेतले.
भोकरदन तालुक्यातील कोदोली येथील रामेश्वर पंढरीनाथ लोखंडे याने एमपीएससी परीक्षेतून मुंबई राज्य विक्रीकर उपायुक्त पदी निवड झाल्याचे सांगितले. याबदल त्याचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कारही करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील वैष्णवी अर्जुन गिरी या विद्यार्थिनीनेही अशाच प्रकारे खोटी कागदपत्रे तयार करत फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या तरुणीने उपजिल्हाधिकारी झाल्याचे सांगत एमपीएससीच्या सही आणि शिक्क्याचे खोटे पत्र तयार केले. या पत्रात तिची निवड स्पोर्ट कोट्यातून झाल्याचा उल्लेखही आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या दोघांवरही कारवाई करण्यात येणार आहे-
या दोन्ही प्रकारांची गंभीर दखल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आली आहे. यावरील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.
-सुनील आवताडे, सहसचिव, एमपीएससी