पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ऑगस्ट 2018मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवेच्या १३६ पदांचा अंतिम निकाल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात करण्यात आला. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील आशिष बारकुल हा राज्यातून प्रथम आला आहे. महिलांमधून पुण्याच्या स्वाती दाभाडे या तर मागासवर्गीयातून सोलापूरचा महेश जमदाडे प्रथम आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यातील ३७ केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती. राज्यसेवेची पूर्व परीक्षा १ लाख ९६ हजार ६९५ उमेदवारांनी दिली होती. त्यातून मुख्य परीक्षेसाठी २ हजार ३८१ विद्यार्थी पात्र ठरले होते. मुलाखतीसाठी निवडण्यात आलेल्या ४२७ विद्यार्थ्यांमधून अंतिम १३६ विद्यार्थ्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये सोलापूरच्या बार्शीतील आशिष बारकुलने बाजी मारली आहे. आशिष बारकुल हा बार्शीतील रहिवाशी असून तो पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. आशिषचे आई-वडिल शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.