पुणे : लोकसभा निवडणुकांमुळे युपीएससीने (UPSC) नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली होती. परीक्षा नियोजनात अडचणी येऊ नये यासाठी लोकसेवा आयोगाने निर्णय घेतला होता. आता राज्यसेवा आयोगानेही (MPSC) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच, समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची सामाईक चाळणी परीक्षा पुढे ढकलली आहे. याबद्दलचे परिपत्रक काढत आयोगाने माहिती दिली.
परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, आयोगातर्फे आयोजित दिनांक २८ एप्रिल, २०२४ रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ तसेच दिनांक १९ मे, २०२४ रोजी होणारी समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या सरळसेवा चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून परीक्षांच्या सुधारित तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील.
तसेच सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता अधिनियम, २०२४ मधील आरक्षणाच्या तरतूदी विचारात घेता, शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर उपरोक्त नमूद परीक्षांच्या बाबतीतील पुढील घोषणा आयोगातर्फे करण्यात येईल, अशीही माहिती देण्यात आली आहे.