पुणे: स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरील अहिल्या लायब्ररीसमाेर मंगळवारी (दि. २०) सायंकाळी सुरू केलेले आंदाेलन दुसऱ्या दिवशीही सुरू हाेते. आयाेगाने विविध मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी बुधवारी सकाळी माेठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाल्याने आंदाेलनाची तीव्रता वाढली. विद्यार्थ्यांनी घाेषणाबाजी करीत, तसेच मागण्यांचे पाेस्टर हातात धरत दिवसभर आंदाेलनाची धग कायम ठेवली.
राज्यसेवा पूर्व परीक्षेचे येत्या रविवारी (दि. २५ जुलै) आयाेजन केले जाणार आहे. मात्र, त्याच दिवशी आयबीपीएसतर्फे बॅंकिंग क्षेत्रातील विविध पदभरतीसाठीची परीक्षा नियाेजित आहे. आयबीपीएस सुमारे वर्षभरापूर्वी परीक्षेची तारीख निश्चित केली हाेती. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांनी आयबीपीएस परीक्षेसाठी अर्ज केले असून, मागील वर्षभरापासून ते तयारी करीत आहेत. त्यात एमपीएससीने लाेकसभा निवडणूक आरक्षण आणि इतर कारणामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तारखेत वेळाेवेळी बदल केला आणि दि. २५ जुलैला परीक्षेचे आयाेजन केले आहे. त्यामुळे या दाेन्ही परीक्षेचे फाॅर्म भरलेल्या उमेदवारांना एका परीक्षेला मुकावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमपीएससीने २५ जुलैला परीक्षेची तारीख पुढे ढकलावी, अशी मागणी केली जात आहे.
मागील अनेक वर्षांपासून कृषी विभागातील पदभरती केलेली नाही. कृषी विभागाने नुकतेच २५८ पदे एमपीएससीकडे भरतीसाठी वर्ग केली आहेत. त्यामुळे २०२४ च्या जाहिरातीत ही पदे समाविष्ट करावीत आणि पूर्वपरीक्षा घ्यावी, असे कृषी पदवीधर उमेदवारांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी दुपारी खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदाेलन स्थळाला भेट देत विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.