पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अखेर २५ ऑगस्ट रोजी होणारी राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने झालेल्या कोंडीमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मागील दोन दिवसांपासून आंदोलनाचे हत्यार उपसले होते. या आंदोलनाला यश मिळालं असून आज झालेल्या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आला. परीक्षेची नवी तारखी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
मात्र त्यांची एक मागणी आयोगाने पूर्ण केली नाही. मागील अनेक वर्षांपासून कृषी विभागातील पदभरती केलेली नाही. कृषी विभागाने नुकतेच २५८ पदे एमपीएससीकडे भरतीसाठी वर्ग केली आहेत. त्यामुळे २०२४ च्या जाहिरातीत ही पदे समाविष्ट करावीत आणि पूर्वपरीक्षा घ्यावी अशा मागणीसाठी विद्यार्थी पुन्हा आंदोलनावर ठाम राहिले. अशातच पुणे पोलिससांकडून विदयार्थ्यांना धरपकड सुरु असल्याचे समोर आले आहे. त्यावेळी एका आंदोलकाने माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. “आमचं शांततेचं आंदोलन होतं. तीन दिवस झाले आम्ही पाणी सुद्धा पिलं नाही. आमच्या मागण्या रास्त आहेत. आम्ही शांतपणे उपोषण करतोय. आमच्या लाखो विद्यार्थ्यांच्या या मागण्या आहेत. महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडतोय”, सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी असं आंदोलक म्हणाला आहे.
दरम्यान पुणे पोलिसांकडूनही यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आंदोलकांची मागणी शासनाने मान्य केली आहे. त्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं होत. आता मुलं पुन्हा पुन्हा आंदोलनाला बसत आहेत. आम्ही वारंवार विनंती करूनही ते ऐकत नसल्याने आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आहे. असे पोलिसांनी सांगितले आहे.
या आंदोलनाला काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार, तसंच काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी भेट देत पाठिंबा दिला होता. रोहित पवार हे रात्रभर विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभागी होते. तसंच राज्य सरकारने या आंदोलनावर तोडगा न काढल्यास मी देखील या आंदोलनात सहभागी होणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता.