पुणे : एमपीएससीने नवीन पॅटर्ननुसार वर्णनात्मक परीक्षा २०२५ पासून लागू करावी या मागणीसाठी साेमवार, दि. २० राेजी विद्यार्थ्यांनी सुरू केलेले ठिय्या आंदाेलन दुसऱ्या दिवशी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरूच हाेते. झाशीची राणी लक्ष्मीबाई चाैकात रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या दीड ते दाेन हजार विद्यार्थ्यांनी साेमवारआणि मंगळवारची रात्र थंडीत जागून काढली. एमपीएससी जाेपर्यंत निर्णय घेत नाही ताेपर्यंत आंदाेलनस्थळ साेडणार नसल्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला. अजूनही आंदोलन सुरूच आहे.
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी मंगळवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार भेट दिली. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शरद पवार म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मला पत्र पाठविले आहे. त्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या मागण्या योग्य असल्याचे सांगितले आहे. एक कुलगुरू मागणी योग्य असल्याचे सांगत आहे. त्यामुळे अशक्य काही नाही, आपण मार्ग काढू शकतो. हा प्रश्न सोडवायचा असेल तर सरकार आणि मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणे गरजेचे आहे. तसेच पवार यांनी बैठकीबाबत मुख्यमंत्र्यांशी कॉल करून संवाद साधला. मुख्यमंत्री यांच्यासोबत याबाबत उद्या किंवा परवा बैठक घेऊ. मी स्वतः बैठकीला हजर राहतो. तुमच्यापैकी कोण येणार आहे? अशी विचारणा केली. त्यावर बळिराम डोळे, अतुल लोंढे अरुण मरळ, रुखसार शेख या प्रतिनिधीचे शिष्टमंडळ चर्चेसाठी येणार असल्याचे आंदोलनाचे नेते बळिराम डोळे यांच्या वतीने जाहीर करण्यात आले तसेच उपोषण मागे घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थी आंदोलनावर ठाम!
शरद पवार यांच्यासोबत विद्यार्थी शिष्टमंडळ बैठकीसाठी जाणार आहे. मात्र, एमपीएससी जोपर्यंत २०२५ मध्ये परीक्षा घेऊ याबाबत अधिकृतपणे नोटिफिकेशन काढणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
मेहनत वाया जाऊ नये म्हणून आंदाेलनात
पुण्यात येऊन तीन वर्षांपासून तयारी करतेय. घरात अर्थिक अडचणी असतानाही पैसे पाठवितात, वय वाढत आहे. त्यात अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत बदलली तर मला पुन्हा क्लासेस लावण्यासाठी खर्च करणे शक्य नाही. माझी एवढ्या वर्षांची मेहनत वाया जाईल म्हणून मी आंदाेलनात आले असल्याचे विद्यार्थिनीने सांगितले.