पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणा-या विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी एकूण पदांच्या आठ पट उमेदवार पात्र होतील,अशा रितीने गुणांची सीमारेषा निश्चित करण्यात येईल, असे एमपीएससीतर्फे प्रसिध्द करण्यात आले होते. परंतु,त्यानंतरची एक ओळ संकेतस्थळावर प्रसिध्द करण्याचे राहून गेले,असा खुलासा एमपीएससीतर्फे करण्यात आला आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या नोकरीचे भवितव्य ठरविणा-या एमपीएसच्या कारभाराबाबतच शंका उपस्थित होत आहे. पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी एकास आठ उमेदवार निवडले जाणार असल्याचे एमपीएससीने प्रसिध्द केले होते.परिणामी हजारो विद्यार्थ्यांच्या संधी डावलल्या जाणार होत्या.त्यामुळे मंगळवारी पुण्यातील सुमारे दिड हजाराहून अधिक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांनी शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान मोर्चा काढला होता.त्यानंतर एमपीएससीने विद्यार्थांच्या मागणीचा विचार करून याबाबतचा खुलासा प्रसिध्द केला आहे.> पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेच्या परीक्षेसाठी एकूण पदांच्या सुमारे 8 पट उमेदवार पात्र होतील.अशा रितीने गुणांची सीमारेषा (कट आॅफ लाईन) प्रथमत: निश्चित करण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक प्रवर्गातील उमेदवारांसाठी साधारणपणे 10 पट उमेदवार उपलब्ध होतील,अशा रितीने सीमारेषा खाली ओढली जाईल. त्यामुळे अशा पध्दतीने मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेले अतिरिक्त उमेदावर केवळ त्यांच्या राखीव प्रवर्गासाठीच्या पदांवरच निवडीसाठी पात्र असतील. या नियमवलीप्रमाणे 2013 पासून एमपीएससीतर्फे पूर्व प्राथमिकचे निकाल जाहीर केले गेले आहेत. या पध्दतीनुसार पदसंख्येच्या सुमारे 12 ते 14 पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र होतात,असा खुलासा आता एमपीएससीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.
एमपीएससीचा एका ओळीचा ‘घोळ’
By admin | Published: May 07, 2015 5:18 AM