लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देश-परदेशांतील ५०० औषध कंपन्यांचे ३५ हजार औषध विक्री प्रतिनिधी (एमआर) हैराण झाले आहेत. नाशिकमध्ये एका ‘एमआर’ने आत्महत्या केली असून, त्यामुळे ‘महाराष्ट्र स्टेट मेडिकल रिप्रेझेंटिव्ह असोसिएशन’ने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
औषध कंपन्यांचे व्यवस्थापक पदोन्नतीसाठी ‘एमआर’ना त्रास देत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. संघटनेचे पदाधिकारी अश्विन शहा यांनी सांगितले की, कोरोनाकाळात ‘एमआर’समोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. कोरोनाकाळात अन्य आजार, काही शस्त्रक्रिया लांबणीवर टाकल्या गेल्यात. कोरोनाशिवाय अन्य आजारांवरच्या औषधांच्या खपाला मर्यादा आहेत. त्याचा औषध कंपन्यांकडून काहीही विचार केला जात नाही. खपाचे उद्दिष्ट गाठले नाही की कंपन्याचे स्थानिक व्यवस्थापक ‘एमआर’ना त्रास देतात. आधीच कमी असलेल्या वेतनात कपात होते. अनेकदा नोकरीवरून काढले जाते.
राज्यात ३५ हजार एमआर काम करतात. औषधांच्या देशी-विदेशी अशा ५०० कंपन्या आहेत. ‘एमआर’ना कसलेही कायदेशीर संरक्षण नाही. कोरोनाकाळात अनेकांंना कामावरून कमी करण्यात आले. नाशिकमधल्या ‘एमआर’च्या आत्महत्येवरून नाशिकमध्ये एक दिवसाचे उपोषण करण्यात आले. आता याविरोधात आवाज उठवण्यासाठी संघटना राज्यस्तरीय आंदोलन करण्याच्या विचारात आहेत.