लावणार एक लाख झाडे
बारामती : उपमुख्यमंत्री अजित वार यांच्या संकल्पनेतील बारामती शहर हरित आणि सुंदर बनविण्यासाठी ‘मिसेस उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अध्यक्ष असलेले एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने बारामती शहर व तालुक्यात एक लाख झाडे लावली जाणार आहेत.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या यांची बारामती तालुका व शहर हरित व सुंदर असावे, अशी संकल्पना आहे. त्यातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तसेच पर्यावरणाचा समतोल राखला जावा, हा या उपक्रमामागे असणारा उद्देश आहे. शहरातील भिगवण रस्त्यावर बारामती सहकारी बँकेनजीक सुनेत्रा पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून मिशन मिलियन ट्री या उपक्रमाची नुकतीच सुरवात करण्यात आली. या वेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव आदी उपस्थित होते.
केपजेमिनी व इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हॅल्यू या संस्थांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले आहे. बारामती तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात तसेच बारामती नगरपालिकेचे जुने गावठाण व वाढीव हद्दीसह, वनविभाग, सामाजिक वनीकरण विभागाच्या जमिनीवरही या झाडांचे वृक्षारोपण केले जाणार आहे.
फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी याबाबत अधिक माहिती दिली. पवार म्हणाल्या, या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी बहुसंख्य ठिकाणी खड्डे घेण्याचे काम पूर्णत्वास गेले आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये झाडे लावण्याचेही काम केले जाणार आहे. बारामती पंचक्रोशीमध्ये प्रथमच एकाच वेळी मोठ्या संख्येने वृक्षारोपणाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये बारामती शहर व तालुक्यातील नागरिकांसह, सेवाभावी संस्था व संघटनांचेही सहकार्य एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियास आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. ही झाडे लावताना अजित पवार यांच्या सूचनेनुसार स्थानिक हवामानामध्ये चांगली वाढ होतील. ज्या झाडांवर पक्षी वास्तव्य करू शकतील अशीच झाडे वृक्षारोपणासाठी निवडली आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
या वृक्षारोपणादरम्यान पिंपळ, करंज, वड, काशिद, अर्जुन, ताम्हण, कांचन, शिसम, सीताफळ, जांभूळ, चिंच, आंबा आदी झाडे लावली जातील. ९८ ग्रामपंचायतींच्या हद्दीत जवळपास ४७ हजार झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभागासह वनविभागाच्या हद्दीतही ४५ हजार झाडे तर बारामती नगरपालिकेच्या हद्दीत आठ हजार झाडे लावण्याचे नियोजन झालेले आहे.
बारामती शहरात सुनेत्रा पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून मिशन मिलियन ट्री या उपक्रमाची नुकतीच सुरुवात करण्यात आली.
१७०७२०२१ बारामती—०१
——