महावितरणचे कर्मचारी अविनाश भोसले यांनी महंमदवाडी पोलीस चौकीमध्ये मारहाण, दमदाटी, शिवीगाळ केल्याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार सचिन बारकू शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, बारकू धाकू शिंदे या वीज ग्राहकाची १ मार्च २०२० पासून १९ हजार रुपये विजबिलाची थकबाकी होती. त्यांना वीजबिल भरण्याबाबत सूचना केली होती, त्यानंतर कर्मचारी त्यांच्याकडे वीजबिल वसुलीसाठी गेले. त्यावेळी तेथे त्यांचा मुलगा सचिन शिंदे आला, त्याने आरडाओरड करीत दमदाटी करून, वीजजोड तोडून दाखवा, पाहतोच अशी धमकी दिली. त्याने घराच्या प्रवेशद्वारापासून शिवीगाळ करीत, हातात बांबू घेऊन मारण्यासाठी अंगावर धावून आला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
महावितरणचे कार्यकारी अभियंता सतीश राजदीप म्हणाले की, वीज वितरण यंत्रणा सुरळीत ठेवायची असेल, तर प्रत्येक नागरिकाने वापरलेल्या विजेचे बिल भरणे आवश्यक आहे. मागील वर्षभरापासून अनेकांकडे विजेची थकीत बिले आहेत, विजेचे बिल वेळेत भरा, मनस्ताप टाळा असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असला तरी काही ठिकाणी मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे वीजबिल वसुली करण्यात अडथळे येत असल्याचे दिसत आहे.