लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लॉकडाऊननंतर महावितरणकडून दिल्या जाणाऱ्या वाढीव विजेच्या बिलांमुळे नागरिकांची झोप उडाली आहे. खराडीतील एका नागरिकाला एका महिन्यासाठी सव्वा लाख रुपयांचे वीजबिल आकारून महावितरणने चांगलाच धक्का दिला आहे. ही रक्कम भरणे शक्य नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
खराडीतील आनंद चौगुले यांनी वाढीव वीजबिलाची आकारणी झाल्याने महावितरणकडे डिसेंबर २०१९ साली पहिल्यांदा तक्रार केली. त्यानुसार १० हजार रुपये भरून नवीन वीजमीटर लावण्यास त्यांना सांगितले गेले. वीजमीटरमध्ये कोणतीही बिघाड नसल्याचा दाखला महावितरणने दिला. कोणतेही वाढीव बिल येणार नसल्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले.
त्याप्रमाणे जानेवारी २०२० ला १ हजार ७० रुपये बिल आले. त्यानंतर मात्र फेब्रुवारी २०२० मध्ये थेट एक लाख पंचवीस हजार नऊशे वीस रुपये इतके बिल चौगुलेंना पाठवण्यात आले. दरम्यान, लॉकडाऊन लागल्याने यावर कोणताही निर्णय झाला नाही. लॉकडाऊन शिथिल होताच पुन्हा चौगुलेंना एक लाख बेचाळीस हजार रुपयांचे बिल पाठवण्यात आले.
चौगुले यांनी खराडी शाखेत तक्रार केली असता आलेले बिल भरावे लागेल, अन्यथा वीज कापली जाईल, असे त्यांना सांगण्यात आले. वडगाव शेरीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता, खराडीतच यावर निर्णय होईल असे सांगितले गेले. ‘वडगावशेरी ते खराडी’ अशा चकरा मारून चौगुलेंचा जीव मेटाकुटीस आला आहे. नियमानुसार बिल भरण्यास तयार आहे, परंतु, चुकीचे बिल दुरुस्त झाले पाहिजे, असे चौगुले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
चौकट
“मीटर रीडिंगनुसार वीजबिलाची आकारणी केली आहे. वीजमीटर तपासणीसाठी त्यांना २० हजार रुपये भरण्यास सांगितले आहे. मीटरमध्ये त्रुटी आढळली तर वीजबिल माफ करण्यात येईल.”
-दिलीप मदने, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण