पुणे: कोरोना संकटात देखील त्यांनी स्वतःसह कुटुंबाचा जीव धोक्यात घालून ऊन, वारा, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता आपले कर्तव्य बजावले. सर्वसामान्य नागरिकांसह मोठमोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी कर्तव्यदक्ष राहिले. वाढीव बिल आल्यामुळे कुठे त्यांना नागरिकांच्या तीव्र रोषाचा सामना देखील करावा लागला. मात्र, महावितरणच्या अशा ३०० च्यावर कंत्राटी कामगारांवर आता मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
बारामती ग्रामीण मंडलातील बारामती शहर, ग्रामीण, इंदापूर, सोमेश्वरनगर या ठिकाणच्या विभागांमध्ये जवळपास ३०३ कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या ३ महिन्यांहून अधिक काळापासून वेतन मिळालेले नाही. वायरमन, रीडिंगमन, ऑपरेटर या पदावर काम करत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांनी महावितरण कोरोना काळात अडचणीत आले असताना खंबीरपणे साथ देत वसुली मोहीम, सातत्यपूर्ण वीजपुरवठा, रीडिंग घेणे यांसारख्या विविध जबाबदाऱ्या समर्थपणे निभावल्या. मात्र काम करून देखील वेतन न मिळाल्यामुळे या सर्व कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. रोजचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्न उभा राहिला आहे.
महावितरणच्या बारामती विभागाला मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी गणेश इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस या कंपनीकडे आहे. मात्र या कंपनीच्या अधिपत्याखाली ही तीनशेच्या वर कंत्राटी कर्मचारी मंडळी काम करत आहे. महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आला आहे. प्रत्यक्षात डिसेंबर महिन्यापासून कर्मचारी कामावर असताना महावितरण ने मार्च महिन्यात मनुष्यबळ भरतीचा आदेश काढला. या आदेशानंतर कंपनीने डिसेंबर महिन्याचे वेतन अदा केले. पण अद्याप ३ महिन्यांचे वेतन बाकी आहे.
याबाबत गणेश इंडस्ट्रीयल सर्व्हिसेसचे मानसिंग जाधव म्हणाले, काही तांत्रिक कारणास्तव महावितरणमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वेतन देता आले नाही. मुळात हे वेतन महावितरणकडून आम्हाला प्राप्त झालेले नाही.मात्र महावितरणने मनुष्यबळ भरतीचा आदेश दिल्यानंतर कंपनीने तात्काळ डिसेंबर महिन्याचा पगार दिला आहे. महावितरणकडून पैसे मिळताच कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन दिले जाईल.
...........
वेतनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार
महावितरणकडून बारामती मंडलात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे वेतन तातडीने देण्याबाबत कार्यालयीन पातळीवर प्रक्रिया सुरू आहे. तसेच संबंधित कंत्राटी कामगार पुरविणाऱ्या कंपनीला देखील वेतन देण्यासंबंधीच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कंत्राटी कामगारांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.
- चंद्रशेखर पाटील,अधीक्षक अभियंता,बारामती ग्रामीण मंडल.