पुणे : पुणे प्रादेशिक विभागात एकाच दिवशी घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेत, १ हजार ४७ ठिकाणी अनधिकृत वीजवापर करणाऱ्यांना महावितरणकडून दणका देण्यात आला आहे. यामध्ये वीजतारेच्या हूकद्वारे किंवा मीटरमध्ये फेरफार केलेल्या ७५६ वीजचोरांचाही समावेश आहे.
पुणे प्रादेशिक संचालक (प्र) अंकुश नाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमाप्रमाणे दंड व वीजचोरीच्या रकमेचा भरणा न केलेल्या वीजचोरांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याचे कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान या महिन्यात आतापर्यंत पुणे प्रादेशिक विभागात सुमारे १ कोटी १८ लाख रुपयांच्या १ हजार ३१० ठिकाणी वीजचोरीचा पदार्फाश करण्यात आला आहे. उघडकीस आलेल्या वीजचोºया विशेषत: सधन व सुशिक्षित घरगुती, व्यावसायिकांसह कृषीग्राहकांकडील आहेत. वीजबिलांच्या थकबाकीमुळे खंडित झालेला वीजपुरवठा परस्पर जोडून घेत किंवा अन्य ठिकाणाहून वीजवापर करणाºया ग्राहकांविरुद्ध सुद्धा या मोहिमेत फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले़
पुणे प्रादेशिक विभागात या महिन्यात आतापर्यंत १ हजार ३१० ठिकाणी १ कोटी १८ लाख रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर उघडकीस आला आहे. यामध्ये (कंसात रक्कम) पुणे जिल्हा- ५८० (६४.५९ लाख), सातारा- २७५ (१६ लाख), सोलापूर- २०५ (२२.२४ लाख), कोल्हापूर- १३० (१३.४० लाख) आणि सांगली जिल्ह्यामध्ये १२० ठिकाणी १.९२ लाखांचा अनधिकृत वीजवापर उघड झाला आहे. यातील ९९ प्रकरणांमध्ये २१ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
---------------------------