बारामती: पुढील आदेश येईपर्यंत वीज तोडणी थांबवण्याचे निर्देश प्रशासनाने महावितरणला दिल्याने क्षेत्रीय कार्यालयांनी तोडून नाही, तर हात जोडून वसुली करण्यास सुरूवात केली आहे. बारामती परिमंडलात ज्या ६१२ गावांमध्ये ‘एक गाव, एक दिवस’ हा उपक्रम राबवला आहे. त्या गावात शेतीपंपाच्या वसुलीला शेतकरी स्वत:हून प्रतिसाद देत आहेत. त्या जोरावरच महावितरणने ९१ कोटींचा टप्पा सुद्धा गाठला आहे. शिवाय गावातून वसूल झालेल्या ३३ टक्के रकमेतूनही विजेची कामे तातडीने करण्यास व प्रलंबित कृषी जोडण्या देण्यास महावितरणने सुरुवात केली आहे. दोन महिन्यात ७ हजार ८९६ कृषी जोडण्या देण्यात आल्या आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या संकल्पनेतून बारामती परिमंडलात ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली. नियोजनपूर्वक गावात जाऊन तेथील ग्रामस्थांच्या विजेच्या समस्या, वीजबिलाच्या तक्रारी निवारण्याचे काम या उपक्रमाने केले आहे. याची पोचपावती म्हणून या ६१२ गावांमध्ये ‘महा कृषी ऊर्जा अभियानां’तर्गत वीजबिल वसुलीला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. हे अभियान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महावितरणतर्फे गावात शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन, त्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मिळणाऱ्या सवलतीची माहिती दिली जात आहे. एकूण थकबाकीच्या साधारणत: ६६ टक्के इतकी सवलत थकीत बिलावर मिळत आहे.
बारामती परिमंडलात आतापर्यंत ५६ हजार ३८९ शेतकऱ्यांनी थकबाकी व चालूबिलापोटी ९१ कोटी ३८ लाखांचा भरणा केला. त्यांना सवलतीपोटी तब्बल ६८ कोटी ५४ लाखांची माफी मिळालेली आहे. मार्च महिन्यात वीज न तोडता वसुलीला गती देण्यासाठी मुख्य अभियंता पावडे यांनी सर्व वीज कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी एक गाव, एक दिवस उपक्रम घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ज्या गावातील शेतकऱ्यांनी वीजबिलाचा भरणा केला आहे, तिथे ग्रामपंचायतीच्या सूचनेनुसार रोहित्र दुरुस्ती, क्षमता वाढवणे, नवीन कनेक्शन देणे यांसह यंत्रणेच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्यास सांगितले आहे. वसुलीच्या 'कृषी आकस्मिक निधी' तून काम करण्यासाठी नामिका प्रविष्ठ ठेकेदारांना कामे दिली जात आहेत. त्या-त्या गावात अशी कामे सुरु झाल्याने शेतकऱ्यांनीही ‘माझे वीजबिल, माझी जबाबदारी’ म्हणत आपले कर्तव्य पार पाडण्यास सुरुवात केली आहे. एकाच रोहित्रावरील ८ शेतकऱ्यांनी,भरले साडेपाच लाख
भोर तालुक्यातील भांबवडे गावच्या गरुड रोहित्रावरील सर्व शेतकऱ्यांनी बुधवारी एकत्र येत त्यांच्या १२ लाख रुपये थकबाकीपोटी साडेपाच लाखांचा एकर कमी भरणा केला. त्यांचे ६.५ लाख माफ झाले. त्याबरोबरच त्यांच्या रोहित्राची संपूर्ण दुरुस्तीचे काम गुरुवारी करण्यात येणार आहे. तसेच अतिरिक्त भारापोटी नवीन रोहित्राचेही नियोजन केले जाणार आहे. महावितरणच्या या तत्परतेबद्दल सर्व शेतकऱ्यांनी महावितरणला धन्यवाद दिले आहेत.