गेल्या दीड वर्षापासून कोरोनाजन्य परिस्थिती असल्यामुळे शेतमालाचे पडलेले दर, मागील वर्षी झालेल्या अति पावसाने खरीप वाया गेला होता. शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांकडे खते घेण्यासाठीही पैसे नाहीत हे खत विक्रीच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. तरीसुद्धा महावितरणने संकटात गाठून शेतकऱ्यांना वीज बिलासाठी सक्ती केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. चालू वर्षी मार्चनंतर आता दुसऱ्यांदा शेतकऱ्यांना वीजबिलांसाठी सक्ती करण्यात येत आहे. चालू थकीत वीजबिलांसाठी विद्युत रोहित्र सोडविण्यात आली असल्याची माहिती काटी केंद्राचे शाखा अभियंता युवराज जाधव यांनी दिली. काटी केंद्राअंतर्गत येणाऱ्या नऊ गावांमध्ये रेडणी, बोराटवाडी, जाधववाडी, काटी, वडापुरी, भोडणी, वकीलवस्ती, सुरवड, रेडा चालू थकबाकी असणारे विद्युत रोहित्र सोडविण्यात आले आहेत.
काही शेतकऱ्यांच्या ३ एचपीचे पंप असून त्यांना ५ एचपीची बिले आली आहेत, तर काहींच्या मोटारी बंद असतानाही सरसकट बिले पाठवण्यात आली आहेत. असे न करता महावितरणने मीटर रीडिंगनुसारच शेतीपंपाची बिले पाठवावीत व आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वारंवार वीजबिलांसाठी तगादा लावल्याने रोष निर्माण झाला आहे, असे मत येथील शेतकरी अमरदीप काळकुटे यांनी व्यक्त केले.
-----------
फोटो क्रमांक :
फोटो ओळी - रेडणी परिसरात पाण्याअभावी खरिपाच्या पेरण्या वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.