पुणे : पुणे शहराच्या भोवती ८७ गावांमधून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने १७३.७२ किलोमीटर लांबीचा रिंगरोड पूर्व आणि पश्चिम या भागातून करण्यात येणार आहे. यातील ११ गावांतील संयुक्त मोजणी पूर्ण झाली असून ७ गावांनी मोजणीला विरोध केला आहे. तर १५ गावांमध्ये लवकरच याबाबत बैठका घेण्यात येणार आहे, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पश्चिम भागातील रिंगरोडसाठी ३७ गावातील एकूण ६९५ हेक्टर जमिनीपैकी आजअखेर ११ गावातील १७० हेक्टर (२५ टक्के) जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे. उर्वरित गावातील जमिनीच्या मोजणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासमोर प्रस्तावित आहे. तर पूर्व भागातील रिंगरोडचे भूसंपादनाचे काम प्रस्तावित असून लवकरच कलम १५ (२) ची अधिसूचना निघाल्यावर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच पर्यावरणविषयक परवानगीसाठी ड्राफ्ट तयार करण्यात येत आहे.
----
...या गावातील मोजणी पूर्ण
रिंगरोडसाठी मुळशी तालुक्यातील कासार आंबोली, भरे, अंबडवेट, कातवडी, घोटावडे, मातेरेवाडी तर हवेली तालुक्यातील वरदाडे, मालखेड, मोरदरवाडी, घेरा सिंहगड आणि भोर तालुक्यातील कुसगव येथील मोजणी पूर्ण झाली आहे.
---
...या गावांचा आहे विरोध
मावळ ३, हवेली १, भोर २ आणि मुळशी तालुक्यातील १ अशा एकूण ७ गावांनी रिंगरोडसाठी जमीन मोजणीस विरोध दर्शविला आहे.