लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहराची वाहतूककोंडीतून मुक्तता करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा (एमएसआरडीसी) १७० किलोमीटरचा रिंगरोडसाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात बजेट हेड सुरू केला आहे. भविष्यात तरतूद करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चा असलेल्या रिंगरोडच्या कामाला गती मिळणार आहे.
पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरासोबतच जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणा-या रिंगरोडसाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.त्यात पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केल्याने मोठी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात जिल्ह्यात एकाही मोठ्या प्रकल्पासाठी अपेक्षित तरदूत न झाल्याने पुणेकरांचा भ्रमनिरास झाला आहे. पुणे जिल्ह्यात दोन टप्प्यात पश्चिम आणि पूर्व असा सुमारे १७० किलोमीटरचा तब्बल २६ हजार कोटी खर्च अपेक्षित असलेला रिंगरोड प्रस्तावित आहे. या रिंगरोडसाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन करावे लागणार असून, केवळ भूसंपादनाचा खर्च ४ हजार ९०० कोटी लागणार आहे. राज्य शासनाने पश्चिम आणि पूर्व अशा दोन्ही टप्प्यांना परवानगी दिली आहे. तर पश्चिम टप्प्यासाठीचे भूसंपादनाचे काम सुरू देखील झाले आहे.
-----
असा होणार रिंगरोड रोड
- पहिल्या टप्प्यात रिंगरोडची लांबी ६८ किलोमीटर
- केळवडे (ता.भोर) पासून उर्से (ता. मावळ) पर्यंत
- रिंगरोड सहा पदरी आणि ८ बोगदे
– खडकवासला बॅकवॉटरवरून मोठा पूल
– एकूण छोटे पूल-३, उड्डाणपूल-२
– रिंगरोडवरून प्रतिदिन ६० हजार वाहने धावतील
– न्यू मार्गावर जाण्यासाठी सहा ठिकाणी इंटरचेंज
– रिंगरोडसाठी सुमारे ७५० हेक्टर जागेची आवश्यकता
– प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे १० हजार कोटी रुपये
--
...या गावांमध्ये होणार भूसंपादन
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से (ता. मावळ) येथून सुरुवात परंदवाडी-धामणे-बेबडओहोळ-चांदखेड-पाचाणे (ता.मावळ)-पिंपळोली-केमसेवाडी-जवळ-पडळघरवाडी-रिहे-मातेरेवाडी- घोटावडे-अंबडवेट-भरे-कासारआंबोली-उरावडे-आंबेगाव-मारणेवाडी-मोरेवाडी-भरेकरवाडी- कातवडी (ता. मुळशी)-बहुली-भगतवाडी-सांगरुण-मांडवी बुद्रुक-मालखेड-वरदाडे-खामगाव मावळ -घेरा सिंहगड-मोरदरवाडी-कल्याण-रहाटावडे (ता. हवेली)-रांजे-कुसगाव-खोपी-कांजळे-केळवडे (ता. भोर)-पुणे-सातारा रोड परिसर.
-----
मावळ : परंदवाडी, उर्से, तळेगाव, वडगाव, कातवी, आंबी, वराळे, आकुर्डी, नाणोलीतर्फे चाकण, इंदुरी, सुदवडी, सुदुंबरे. हवेली : तुळापूर, भावडी, लोणीकंद, पेरणे, बकोरी, डोंगरगाव, वाडे बोल्हाई, गावडेवाडी, मुरकुटेनगर, बिवरी, पेठ, कोरेगाव मुळ, शिंदवणे, वळती, तरडे, आळंदी म्हातोबाची. पुरंदर : सोनोरी, काळेवाडी, दिवे, हिवरे, चांबळी, कोडीत खुर्द, गराडे.
खेड : खालुंब्रे, निघोजे, मोई, कुरळी, चिंबळी, केळगाव,आळंदी, च-होली खुर्द, धानोरे, सोळू, मरकळ, गोळेगाव.
भोर : कांबरे, नायगाव, केळवडे.
---
....असा असेल दुसरा टप्पा
पुणे-सातारा रस्त्यावरील वरवे बुटूक येथून सुरू होणार असून पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील उसे येथे येऊन मिळणार आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग नाशिक-सोलापूर आणि सातारा महामार्गाला जोडणार. खेड, हवेली, पुरंदर आणि भोर तालुक्यातून जाणार.