पुणे : केंद्र सरकारच्या नवीन स्क्रॅप पॉलिसीनुसार राज्यभरातील एसटी महामंडळाच्या जवळपास ३ हजार गाड्या भंगारात निघणार आहे. सरकारने नवीन स्क्रॅप धोरणात ८ लाख कि.मी. प्रवासाची मर्यादा घातली आहे. त्यानुसार ८ लाख कि.मी. प्रवास केलेल्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात जवळपास ३ हजार गाड्या आहेत. त्या सर्व गाड्या भंगारात निघणार आहे. नव्या धोरणाचा एसटी महामंडळाला मोठा फटका बसणार आहे.
पुणे विभागाच्या जवळपास १६ गाड्यांनी ८ लाख कि.मी.हून अधिक प्रवास केला आहे. त्यामुळे या गाड्या भंगारात काढण्यासाठी पुणे विभागाने मध्यवर्ती कार्यालयास प्रस्ताव पाठविला होता. तो मंजूर देखील झाला आहे. लवकरच या गाड्या प्रवासी सेवेतून बाद होणार आहे. १६ गाड्या बाद झाल्याने जवळपास ३ ते ४ हजार प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
एसटीची वर्गवारी
राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सद्य:स्थितीत जवळपास १६ हजार बस गाड्या आहेत. यात १० वर्ष व त्याहून अधिक काळ झालेल्या ३० टक्के, ८ वर्षांच्या आतील ३९ टक्के व ८ ते १० वर्षातील ३१ टक्के गाड्या आहेत. त्यामुळे आयुर्मान संपलेल्या जवळपास ६१ गाड्या भंगारात निघणार आहे. या सर्व गाड्या आता टप्प्याटप्प्याने भंगारात काढाव्या लागणार आहेत. पहिल्या टप्यात जवळपास ३ हजार गाड्या भंगारात काढल्या जाणार आहेत.
जिल्ह्यातील एकूण आगार
पुणे विभागात जवळपास १३ आगार आहेत. यात जवळपास ९५० गाड्या धावत आहे. यात आठ लाखांपेक्षा अधिक प्रवास केलेल्या १६ गाड्या आहेत. त्यास स्क्रॅप करण्याची परवानगीदेखील मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाने दिली आहे.
चेसी नवी, एसटी जुनी
राज्य परिवहन महामंडळाचे कोरोना काळात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता जवळपास ३ हजार गाड्या भंगारात निघतील. तेव्हा एसटी गाड्या खरेदीसाठी एसटीकडे मोठ्या प्रमाणात भांडवल नाही. अशात एसटी प्रशासन नेहमीप्रमाणे चेसी तीच ठेवून आपल्या कार्यशाळेत केवळ बॉडी बदलणार आहे.