पुणे : राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा विभागांत विविध २० ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. पहिल्याच टप्प्यात १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर यांनी दिली.
राज्य शासनाने जिल्ह्यातील जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित केला असल्याने पहिला पर्यटन महोत्सव येथे होणार आहे. जुन्नर येथील या द्राक्ष महोत्सवात द्राक्ष बाग भेट, जुन्नर हेरिटेज वॉक, वायनरी भेट, पक्षी निरीक्षण उपक्रम, देवराई भेट, नाणेघाट सहल, बोटिंग, ओझर गणपती दर्शन, गीब्सन स्मारक भेट, लेण्याद्री गणपती दर्शन, ताम्हणे संग्रहालय भेट, अंबा अंबिका लेणी समूह भेट आदींचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यात वाई महोत्सव तर कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.
चौकट
नवनवी पर्यटनस्थळे प्रकाशझोतात आणण्याचा उद्देश
“पर्यटन महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील फार लोकप्रिय नसलेली ठिकाणे महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर आणण्याचा उद्देश आहे. राज्याची भटकंती करण्याची संधी या महोत्सवातून मिळणार आहे. राज्याला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा आणि राज्याचे सौंदर्य या महोत्सवांतून पाहण्याची संधी पर्यटकांना मिळेल.”
- सुप्रिया करमरकर, उपसंचालक, पर्यटन संचालनालय
चौकट
शेतकरी व स्थानिकांना उत्पन्न
“जुन्नर तालुक्यात तीन दिवस द्राक्ष महोत्सव होत आहे. यात द्राक्षबाग भेटीसोबत मनोरंजनात्मक कार्यक्रमांसोबतच बचत गटांचे स्टाॅल असतील. यातून शेतकरी व स्थानिकांना उत्पन्नाचे साधन मिळेल.”
-जितेंद्र बिडवई, अध्यक्ष, जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघ