पिंपरी : महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पर्यटनाला चालना देण्यासाठी येत्या १९ ते २८ फेब्रुवारी दरम्यान पर्यटन महोत्सव आयोजित केला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील २० ठिकाणी हा महोत्सव भरविला जाणार आहे. या माध्यमातून लोकसंगीत, निसर्गरम्य ठिकाणे पाहण्याची आणि स्थानिक खाद्यपदार्थ चाखण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये १९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत पर्यटन महोत्सव आयोजित केला आहे. त्यात द्राक्ष बाग भेट, जुन्नर हेरिटेज वॉक, वायनरी भेट, पक्षी निरीक्षण, देवराई, नाणेघाट, बोटिंग, ओझर गणपती दर्शन, गिब्सन स्मारक भेट, लेण्याद्री गणपती, ताम्हणे संग्रहालय, अंबा अंबिका लेणी, जुन्नर आठवडे बाजार, कॅम्प फायर आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम होतील.
सातारा जिल्ह्यात वाई महोत्सवांतर्गत वाई तालुका दर्शन आयोजितचे प्रस्तावित आहे. कोल्हापूरमध्ये नगरपालिकेच्या सहाय्याने २६ ते २८ फेब्रुवारीला महोत्सव होईल. सांस्कृतिक, खाद्य महोत्सव, शस्त्र प्रदर्शन, बचतगट स्टॉल, लोकसंगीत, पोवाडे, लावणी, सायकल, मॅरेथॉ़न स्पर्धा, मैदानी खेळ, अंध मुलांचा कार्यक्रम, मशालींच्या प्रकाशात पन्हाळगड दर्शन, छत्रपती संभाजीराजे यांच्यावर आधारित नाटक, मनोरंजनात्मक कार्यक्रम, कोल्हापुरी मिसळ, तांबडा-पांढरा रस्सा अशी खाद्य-पर्यटन-सांस्कृतिक मेजवाणी अशी कार्यक्रमांची रेलचेल असल्याची माहिती पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर आणि एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली.
कोरोनांनतर पर्यटनाची स्थिती आता पूर्वपदावर येत आहे. महाराष्ट्र समजून घेण्यासाठी या महोत्सवात पर्यटकांनी सहभागी व्हावे. राज्याचा सांस्कृतिक आणि नैसर्गिक सौंदर्याचा वारसा पाहण्याची संधी या माध्यमातून मिळेल.
- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ