नम्रता फडणीस, पुणेपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) घेण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेत कलाकारांच्या कलाकृतीवर पारितोषिकांची मोहोर उमटली खरी; परंतु तीन महिने उलटून गेले, तरी पारितोषिकांची रक्कमच विजेत्यांच्या हाती पडली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हक्काच्या पैशांसाठी विजेत्यांवर एमटीडीसीचे उंबरे झिजविण्याची वेळ आली आहे. एखाद्या स्पर्धेत पुरस्कार मिळाल्याचा आनंद काही निराळाच असतो. त्यातही जर पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक आणि तेही घसघशीत रकमेचे असेल, तर मग विचारायलाच नको. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी पारितोषिक हुरूप देणारे असते. अशीच काहीशी आनंदानुभूती स्पर्धेत सहभागी झालेल्यांनी आली. पारितोषिक जाहीर झाल्यानंतर त्यांच्यासाठी जणू आकाशच ठेंगणे झाले होते. दर वर्षी जानेवारी महिन्यात होणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) एमटीडीसीतर्फे लघुपट स्पर्धा घेतली जाते. यंदाच्या वर्षी ‘औरंगाबाद अॅज अ टुरिस्ट डेस्टिनेशन’, ‘वाईल्ड लाईफ आॅफ विदर्भ (ताडोबा) आणि ‘कोकण- बीचेस अॅँड स्कूबा डायव्हिंग’ अशा तीन विभागांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. या तिन्ही विभागांमधून पिफच्या समारोपामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली. यामध्ये पारितोषिकाची रक्कम ही अनुक्रमे १ लाख २५ हजार रुपये व ७५ हजार रुपये, अशी होती. पारितोषिकाच्या रकमेतील विलंबासंदर्भात एमटीडीसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, शासनाकडून एमटीडीसीला निधीच उपलब्ध झालेला नाही. नुकतीच आॅर्डर निघाली आहे. मात्र, पैसे जमा झाल्यानंतरच धनादेश काढण्यात येईल, असे सांगण्यात आले.
विजेते झिजवताहेत ‘एमटीडीसी’चे उंबरठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2016 1:22 AM