सुषमा नेहरकर-शिंदे / प्रवीण खुंटेपुणे : मु. पो. फुटपाथ. गेल्या २५ वर्षांपासून येथे ‘निवास’. रेशन कार्ड, आधार कार्ड आहे. मतदान ओळखपत्रही मिळालेले; मात्र निवारा मिळालेला नाही. पुण्यातील तब्बल २५० कुटुंबांची ही अवस्था आहे. विशेष म्हणजे, नागरिकांना आधार, मतदान कार्ड काढताना हा पुरावा द्या.. रेशन कार्ड, लाइट बिल, घरमालकाचे संमतिपत्र द्या, अशा हजारो अडचणी येत असताना, रस्त्यावर राहणाऱ्या व कोणतेही पुरावे नसतानाही केवळ मतदानासाठी या कुटुंबांना ही सगळी कागदपत्रे देण्यात आली आहेत. या सर्व कुटुंबांच्या आधार कार्ड व मतदान कार्डावर ससून फुटपाथ, काँगे्रस भवन फुटपाथ, फर्ग्युसन रस्ता फुटपाथ, असे आश्चर्यकारक पत्ते आहेत. निवडणुकीचा अजेंडा डोळ्यांसमोर ठेवून एक गठ्ठा मतदानासाठी रस्त्यावरच्या लोकांना व्यवस्थितरीत्या मतदान कार्ड व पुराव्यासाठी आधार कार्ड काढून देणारे राजकीय पुढारी या रस्त्यावरच्या लोकांच्या मूलभूत गरजांकडे मात्र लक्ष देत नसल्याची खंत या लोकांनी ‘लोेकमत’कडे व्यक्त केली.गावाकडे जमीन, रोजगाराच्या संधी नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी सोलापूर, लातूर, उस्मानाबादसह राज्यातील विविध भागातून व अन्य राज्यांतून हजारो लोक पुणे शहरात वास्तव्यासाठी आले आहेत. राहण्यासाठी जागा नसल्याने हजारो कुटुंबं गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील फुटपाथ, पुलाखाली पाल टाकून व उघड्यावरच आपले जीवन जगत आहेत. दररोजच्या भाकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी आईवडिलांसह लहान पोरं रस्त्यावर फुगे, फुले, लहान मुलांची पुस्तके, खेळणी विकतात. यातील काही कुटुंबे गेल्या २०-२५ वर्षांपासून शहरात वेगवेगळ्या फुटपाथवर राहत आहेत. फुटपाथवर राहणाऱ्या लोकांसाठी राजकीय पुढाऱ्यांनी बोगस पुरावे तयार करून त्यांना रेशन कार्ड, मतदान कार्ड आणि आता आधार कार्डदेखील काढून दिले आहे. प्राथमिक सुविधा, निवारा, पाणी, शौचालय, अन्न शिजवण्याची कसलीच व्यवस्था नसलेल्या या लोकांना मात्र राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने मतदान कार्ड व आधार कार्ड मिळाले आहे.मतदानाच्या वेळी एका गाडीत टाकून त्यांना घेऊन जायचे, हवे असलेल्या चिन्हावर मतदान करून घ्यायचे आणि पुन्हा आणून सोडायचे, निवडणुकी पूर्वी तुमच्यासाठी हे करू... ते करू.. अशी आश्वासने देणारी राजकीय पुढारी मंडळी पुन्हा आमच्याकडे डोकूनदेखील पाहत नाही. अनेक वेळा रेल्वेस्टेशनवर कितीतरी चोऱ्या किंवा इतर गैरप्रकार घडल्यावर, पोलीस पहिल्यांदा आमचीच झाडाझडती घेतात, रात्री-अपरात्री पोरा-बाळांना मारहाण करतात. चोर भलतेच असतात; पण शिक्षा मात्र आम्हाला. आम्ही दररोज फुगे, लहान मुलांची खेळणी विकून आमचे पोट भरतो. आमचा एक भाऊ दररोज रात्री मुंबईला जाऊन तगर जातीची फुले घेऊन येतो. त्या फुलांच्या वेण्या-गजरे करून आम्ही ते सायंकाळी विकतो. आम्ही कष्ट करूनच पैसे मिळवितो. कुणाचेही फुकटचे काही घेत नाही.-परशुराम पवार, फुटपाथवरील रहिवासीरहिवास पुरावा म्हणून फुटपाथचा पत्ता देता येत नाहीरेशन कार्ड, मतदान कार्ड आणि आधार कार्ड काढण्यासाठी रहिवास पुरावा म्हणून ठोस कागदपत्रे पुरावा म्हणून जोडावीच लागतात. त्यात रहिवास पुरावा म्हणून कोणत्याही परस्थिती फुटपाथ पत्ता असूच शकत नाही. शहरात अशा प्रकारे काही मतदान कार्ड, आधार कार्डाचे वाटप झाले असेल, तर चौकशी करू. - समीक्षा चंद्राकार, जिल्हा उपनिवडणूक निर्णय अधिकारी
मु. पो. फुटपाथवर ‘आधार’ला नाही निवारा
By admin | Published: January 09, 2016 1:49 AM