पुणे: विकास आराखड्यातील सुचना झुगारून देत महामेट्रो अनेक ठिकाणी बांधकाम करत असल्याची टीका आम आदमी पार्टी (आप) ने केली. महापालिका प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने करदात्या नागरिकांच्या पैशांचे नुकसान होत असल्याचे आप चे म्हणणे आहे. स्वत:च्या बांधकामाचे नकाशे मंजूर करण्याचे अधिकार महामेट्रोला कायद्यानेच दिले असल्याने या चुका होत असल्याचा आरोप आप ने केला.
पक्षाचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले की महापालिका व महामेट्रो यांच्यामध्ये कामासाठी समन्वय आहे. तो नाही. महामेट्रो त्यांच्या सोयीप्रमाणे काम करत असते. महापालिका अधिकारी त्यांना परवानगी देते. त्यानंतर तक्रारी झाल्यावर ते काम काढून टाकण्याचा किंवा थांबवण्याचा आदेश दिला जातो. शिवाजीनगर सिमला ऑफिस चौकाजवळ महामेट्रो ने ४५ मीटर रस्ता रुंदीने बाधित जागे मध्ये बांधकाम केले आहे. तसेच शिवाजीनगर चौकाकडून जुन्या एसटी स्थानकाकडे जाणारा प्रस्तावित ३० मीटर रस्ता रुंदीतही बांधकाम केले आहे. आप च्या तक्रारीनंतर आता आयुक्तांनी हे काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते शंकर थोरात यांना तब्बल ६ महिने याचा पाठपुरावा करावा लागला. त्यानंतर प्रशासनाला जाग आली. वाकडेवाडी येथील खडकी च्या दिशेचा डीपी रोडवर मेट्रोने रूळ टाकल्याचे आढळून आले आहे. कृषी महाविद्यालयाचा न.ता. वाडी येथील वहीवाटीच्या रस्त्यावर बांधकाम केल्याने रस्ता बंद झाला आहे. येरवडा येथे मेट्रोचा जिना रस्त्यामध्ये आला होता. अशा अनेक चुकांमुळे जनतेचा पैसा वाया जात आहे. मेट्रो हे पुणे मनपा बांधकाम विभागाकडून नकाशे मंजूर करून घेत नसल्याने या चुका होत आहेत. या मनमानीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीला जबाबदार कोण असा सवाल आप ने केला.