Baramati Vidhan Sabha 2024: बहुचर्चित 'बारामती' विधानसभेचा उद्या फैसला; मतमोजणीची प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 05:29 PM2024-11-22T17:29:09+5:302024-11-22T17:30:05+5:30
मतमोजणी सुरू होण्यापूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना गोपनीयतेची शपथ दिली जाईल अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली
बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवारी(दि २३) पार पडत आहे. आज सकाळी ८ वाजता ही मतमोजणी प्रक्रिया वखार महामंडळ गोडाऊन येथे होणार असून त्याकरिता प्रशासन सज्ज आहे ,अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली. येथील व व्यवस्थेचा संपूर्ण आढावा नावडकर यांनी घेतला.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, आज २३ उमेदवारांकरिता मतमोजणी होणार असून याकरिता ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्त केली आहे. ईव्हीएम मतमोजणी करिता २० टेबल, पोस्टल बॅलेट मतमोजणी करिता ८ टेबल तर ईटीपीबीएस साठी २ टेबल लावण्यात आले आहे. प्रथम टपाली मतपत्रिका मोजणी सकाळी ८ वाजता सुरू होईल. तर ८.३० ला ईव्हीएम मोजणीला सुरुवात होईल. मतमोजणीचे एकूण २० राऊंड होणार आहेत. मतमोजणी प्रक्रियेत कुठलाही अनुसूचित प्रकार घडु नये, याकरिता चोक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. यामध्ये १ उपविभागीय पोलीस अधिकारी, २पोलीस निरीक्षक, १२ पोलीस अधिकारी, ७८ पुरुष पोलीस कर्मचारी, २६ महिला पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त बीएसएफ चे ३ सेक्शन हरियाणा एस आर पी एफ चे ३ सेक्शन तर राज्य एस आर पी एफ १ सेक्शन इत्यादी यंत्रणा तैनात केली आहे.
मतमोजणी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण...
दिनांक २२ रोजी दुपारी ३ वाजता मतमोजणी प्रक्रियेला निवडण्यात आलेले काउंटिंग सुपरवायझर, काउंटिंग असिस्टंट आणि मायक्रो ऑब्झर्वर यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक नाझिम खान उपस्थित होते तर निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी प्रशिक्षणाला मार्गदर्शन केले. मतमोजणीच्या वेळी सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र आवश्यक आहे. त्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, मोबाईल आणण्याची परवानगी नाही. बाहेर गेले तर पुन्हा प्रवेश मिळणार नाही, इत्यादी सूचना या प्रशिक्षणामध्ये देण्यात आल्या. तसेच टपाली मतमोजणी प्रक्रिया, इव्हीएम मतमोजणी प्रक्रिया, अवैध मतप्रक्रिया ठरण्याची कारणे इत्यादी सर्व विषयांची सखोल माहिती नावडकर यांनी याप्रसंगी दिली. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना गोपनीयतेची शपथ दिली जाईल अशी माहिती नावडकर यांनी याप्रसंगी दिली.