पुणे : मनरेगा, मुद्रा, स्टॅण्डअप इंडिया या माेदी सरकारच्या काळातील याेजना न्याय याेजनेपेक्षा प्रभावी असल्याचे मत दलित इंडियन चेंबर ऑफ काॅमर्सचे (डिक्की) चेअरमन मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे 'भारतीय उद्योग विश्वातील सद्यस्थिती' या विषयावर वार्तालापाचे आयाेजन करण्यात आले हाेते, त्यावेळी ते बाेलत हाेते.
कांबळे म्हणाले, न्याय याेजनेपेक्षा मनरेगा, मुद्रा, स्टॅण्डअप इंडिया या याेजना चांगल्या आहेत. युपीए सरकारने त्यांच्या याेजना लाेकांपर्यंत पाेहचविल्या नाहीत. माेदी सरकारच्या काळात सरकारी याेजना नागरिकांपर्यंत पाेहचविण्यात आल्या. माेदी सरकार हे मागील सरकारपेक्षा चांगले हाेते. अर्थव्यवस्थेबाबत बाेलताना ते म्हणाले, भारताने जेव्हा खुली अर्थव्यवस्था स्विकारली तेव्हा या साेबत अनेक आव्हाने सुद्धा अर्थव्यवस्थेसमाेर निर्माण झाली. काळापैसा, समांतर अर्थव्यवस्था, कॅश इकाेनामी ही त्यापैकी काही आव्हाने हाेती. त्यामुळे स्वच्छ अर्थव्यवस्थेसाठी नाेटाबंदी करण्यात आली. तसेच जीएसटी देखील लागू करण्यात आले. देशाची अर्थव्यवस्था डिजीटल करण्यासाठी हे बदल करण्यात आले.
सध्या महागाई ही नियंत्रणात ठेवण्यात आली आहे. भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे असे जे म्हंटले जाते यात तथ्य नसल्याचे मला वाटते. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील वेगाने वाढत जाणारी अर्थव्यवस्था आहे. आपली अर्थव्यवस्था ही जगातील सहावी सर्वात माेठी अर्थव्यवस्था आहे. शेती व्यवसायाबाबात बाेलताना कांबळे म्हणाले, राज्याचे बजेट हे शेतीला डाेळ्यासमाेर ठेवून केले जाते. शेतीत नवनवीन तंत्रज्ञान आणण्याची गरज आहे. खासगी क्षेत्राने देखील शेतीत गुंतवणूक करायला हवी. सामूहिक शेतीची सध्या गरज आहे. शेती हा उद्याेग समजून केल्यास यश मिळू शकते.
याबराेबरच भारतीय सफरचंदाची जागतिक स्तरावर ब्रॅंण्डिंग करणार असल्याचेही कांबळे यांनी यावेळी सांगितले.