पुण्यातील सात पोलिस ठाण्यांना लवकरच मुहूर्त; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सूतोवाच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 01:17 PM2024-09-13T13:17:13+5:302024-09-13T13:17:34+5:30

आंबेगाव, नांदेडसिटी, बाणेर, खराडी, वाघोली, फुरसुंगी आणि काळेपडळ ही नवीन सात पोलीस ठाणी प्रस्तावित आहेत

Muhurta to seven police stations in Pune soon; Deputy Chief Minister Ajit Pawar | पुण्यातील सात पोलिस ठाण्यांना लवकरच मुहूर्त; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सूतोवाच

पुण्यातील सात पोलिस ठाण्यांना लवकरच मुहूर्त; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सूतोवाच

पुणे: पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गत नव्याने प्रस्तावित असलेल्या सात पोलिस ठाण्यांना अस्तित्वात येण्याच्या दृष्टीने लवकरच मुहूर्त मिळणार आहे. याबाबतचे सूतोवाच खुद्द उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले आहे. चाकण दौऱ्यादरम्यान पुण्यासह पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला एकूण ११ पोलिस ठाण्यांना मंजुरी दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यांच्या स्थापनेला गती मिळण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

आंबेगाव, नांदेडसिटी, बाणेर, खराडी, वाघोली, फुरसुंगी आणि काळेपडळ ही नवीन सात पोलिस ठाणी प्रस्तावित आहेत. शहरातील भारती विद्यापीठ, सिंहगड रोड, चतुःश्रृंगी, लोणीकाळभोर, लोणीकंद, हडपसर, वानवडी आणि कोंढवा या पोलिस ठाण्यांचे विभाजन करून, तर हवेली आणि हिंजवडी या पोलिस ठाण्यांचा काही भाग समाविष्ट करून या नवीन सात पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहे.

राज्य शासनाने ही नवीन सात पोलिस ठाणी सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याला प्रशासकीय मान्यतादेखील मिळाली आहे. पोलिस ठाण्यासाठी जागा पाहून हद्दीचे नकाशेसुद्धा तयार करण्यात आले आहेत. मात्र मनुष्यबळ आणि आर्थिक निधीची तरतूद झाली नसल्यामुळे या पोलिस ठाण्यांचे कामकाज अद्याप सुरू होऊ शकलेले नाही. विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वी सरकार पुण्याच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकते. त्यामध्ये या नवीन पोलिस ठाण्यांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

सध्या शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत ३२ पोलिस ठाणी असून, दररोज शेकडो तक्रारींची प्रकरणे येथे दाखल होत असतात. हा कारभार पाच परिमंडळामध्ये विभागला आहे. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, नवी अनेक गावे शहराशी जोडली जात आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणेवरचा ताण वाढतो आहे. शिवाय वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्याचा विचार करून शहरातील ३२ पोलिस ठाण्यांत आणखी नव्याने सात पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यामुळे शहरात तब्बल ३९ पोलिस ठाणी यापुढे राहतील.

शहरातील काही पोलिस ठाण्यांची हद्द मोठी आहे. तेथे दाखल होणाऱ्या तक्रारींचे प्रमाण इतर पोलिस ठाण्यांच्या तुलनेत चार ते पाच पटीत आहे. पोलिसांना हद्दीत नियंत्रण ठेवताना दमछाक होत आहे. शिवाय उपनगरांचा मोठा भाग या पोलिस ठाण्यांना जोडला गेला आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा सर्वांगीण विचार करून या मोठ्या पोलिस ठाण्यांचे विभाजन करून आणि इतर काही भाग समाविष्ट करून ही सात पोलिस ठाणी निर्माण करण्यात येणार आहेत.

सात पोलिस ठाणी निर्माण करण्याबाबत आम्ही शासनाला प्रस्ताव दिला होता. त्याबाबत गृहमंत्री आणि वित्तमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. सात पोलिस ठाणी सुरू होण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. त्याला या महिन्याअखेर मंजुरी मिळेल अशी आशा आहे. तर विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी सात पोलिस ठाण्यांचा विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे. - अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे

Web Title: Muhurta to seven police stations in Pune soon; Deputy Chief Minister Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.