पुणे : भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून मुख्यमंत्री तसेच चंद्रकांत पाटील यांच्यासह 124 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यात पुण्याच्या महापाैर मुक्ता टिळक यांना कसबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी दिल्याबद्दल टिळक यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि अमित शहा यांचे आभार मानले असून गाेपिनाथ मुंडे यांची याप्रसंगी आठवण हाेत असल्याचे त्या म्हणाल्या.
मुक्ता टिळक या टिळक घराण्याच्या सून आहेत. गेल्या 20 वर्षांपासून त्या भारतीय जनता पक्षाचे काम करीत आहेत. सध्या त्या पुण्याच्या महापाैर पद भूषवत आहेत. गिरीश बापट हे लाेकसभेवर निवडूण गेल्याने कसब्यातून काेणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते. मुक्ता टिळक यांच्याबराेबरच इतर नगरसेवक देखील उमेदवारीसाठी आग्रही हाेते. त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कसब्यातून लढतील अशा शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत हाेत्या.
उमेदवारी झाहीर झाल्यानंतर टिळक कुटुंबियांनी आनंद साजरा केला. मुक्ता टिळक म्हणाल्या, गेली 20 वर्षे मी पक्षाचे काम करत आहे. पक्षाने अनेकदा नगरसेवक हाेण्याची संधी दिली. आता विधानसेभेत जाण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. लाेकमान्य टिळकांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिली त्याबाबद्दल पंतप्रधान नरेंद्र माेदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट यांचे धन्यवाद. आमचे नेते गाेपिनाथ मुंडे यांची आज प्रकर्षाने आठवण हाेत आहे. कार्यकर्त्यांच्या जाेरावर कसबा विधानसभेची जागा निवडणूक आता लढवत आहे.
दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुक्ता टिळक यांनी केसरीवाडा गणपतीचे दर्शन घेतले. व लाेकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. पुण्याचा मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची आरती करुन त्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत.