पुणे : मुक्त सृजन साहित्य पत्रिकेच्या वतीने विजय शेंडगे (पुणे), सुवर्णा पवार-खंडागळे (सांगली), शिवाजी शिंदे (सोलापूर) आणि प्राजक्ता ऐनापुरे-सणस (पुणे) यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.
मुक्त सृजन साहित्य पत्रिकेतर्फे काव्य व कादंबरी या साहित्यकृतींना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा पत्रिकेचे संपादक प्रा. डॉ. महेश खरात यांनी केली. प्रौढ विभागासाठी दिला जाणारा मुक्त सृजन पेरियार(ई. व्ही. रामस्वामी नायकर) कादंबरी पुरस्कार विजय शेंडगे यांच्या ‘तमोहरा’ व सुवर्णा पवार-खंडागळे यांच्या ‘हिकमत’ या कादंबऱ्यांना विभागून दिला आहे. तर नवोदित विभागात प्रथम प्रकाशनास दिला जाणारा मुक्त सृजन वालाई काव्य पुरस्कार शिवाजी नारायणराव शिंदे यांच्या कैवार (शब्द शिवार प्रकाशन, मंगळवेढा) व प्राजक्ता ऐनापुरे सणस यांच्या ‘प्राजक्ताची शब्दफुले’या काव्यसंग्रहास विभागून दिला आहे. रोख पाच हजार रुपये, मानपत्र, मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ही रक्कम दोन्ही पुरस्कार प्राप्त लेखकांमध्ये विभागून देण्यात येईल.
डॉ. मुरहरी केळे, त्रिपुरा यांच्या अध्यक्षतेखाली प्रा.डॉ. संतोष देशमुख, प्रा.डॉ.विठ्ठल जंबाले, प्रा. डॉ. किसन माने यांनी पुरस्कार निवडीचे काम पाहिले. या पुरस्काराचे संयोजन प्रा. डॉ. महेश खरात प्रा. डॉ. रामकिशन दहिफळे व कवयित्री प्रिया धारूरकर यांनी केले आहे. कोरोनाचे संकट कमी झाल्यावर एप्रिल अथवा मे महिन्यात पुरस्काराचे वितरण करण्याचा संस्थेचा मानस आहे.