नामदेव मोरे
पुणे - जिल्ह्यातील भोरपासून जवळ असलेल्या राेहिडा किल्ल्याला विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असेदेखील संबोधले जाते. भोर - महाबळेश्वर डोंगररांगेतील कमलगड, केंजळगड व रायरेश्वरच्या पट्ट्यात या किल्ल्याचा समावेश होतो. पुणे जिल्ह्यातील मावळांमध्ये हिरडस मावळचा हा भाग. इतिहासात प्रसिद्ध असलेल्या बांदल यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. किल्ल्याबरोबर बांदल सेनाही स्वराज्यात सहभागी झाली. यामुळे या किल्ल्याला विशेष महत्त्व आहे. वर्षभर किल्ल्यावर सहजपणे जाता येते. पायथ्यापासून किल्ल्यावर एक तासात पोहोचता येते. किल्ल्यावर व मार्गावर पर्यटकांसाठी बैठक व्यवस्थेची सोय केली आहे. किल्ल्याच्या पहिल्या दरवाजावर गणेश पट्टी पाहायला मिळते. पुरातन अवशेष व अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्यावर सर्व ऋतूंमध्ये इतिहासप्रेमींची पावले वळू लागली आहेत.
गडावर पुरातन वास्तूचे अनेक अवशेष पाहायला मिळतात. या किल्लेदाराचे निवासस्थान, भैरोबाचे मंदिर असून, समोर तलाव आहे. बुरुजामध्ये चोर दरवाजाही पाहायला मिळतो. येथील भूमिगत टाक्यात वर्षभर पाणी असते. रोहिडेश्वर किल्ला जलव्यवस्थापनाचा उत्तम नमुना आहे. पाण्याची भरपूर टाकी गडावर पाहायला मिळतात. गडावरील बांधकाम करण्यासाठी तयार केलेला चुन्याचा घाणा व इतर अवशेषही पाहता येतात. साधारणत: एक ते दीड तासात गडाची भटकंती पूर्ण होते. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना गडावर सहज चालत जाता येते.
दोन महान योद्ध्यांची भेट छत्रपती शिवाजी महाराजांनी बांदलांशी लढाई करून रोहिडेश्वर स्वराज्यात आणला. लढवय्या बांदल सेनेलाही स्वराज्यात सहभागी करून घेण्यात आले. याच किल्ल्यावर बाजीप्रभू देशपांडे यांची शिवाजी महाराजांशी पहिली भेट झाल्याचे मानले जाते. पुरंदरच्या तहामध्ये हा किल्लाही मोघलांना देण्यात आला होता. १६७० मध्ये तो पुन्हा स्वराज्यात आणला. पुढे भोर संस्थानाच्या अधिपत्याखाली हा किल्ला होता.
काय पहाल? : रोहिडेश्वर किल्ल्यावरील दोन दरवाजे. किल्ल्यावरील गणेश पट्टी, शिलालेख, चोर दरवाजा. भक्कम बुरूज, पुरातन वास्तूचे अवशेष, भुयारी टाकी, तलाव, मंदिर, पाण्याची टाकी पाहायला मिळतात. गडावरून कमलगड, केंजळगड, रायरेश्वरचा परिसर पाहायला मिळतो.
कसे जाल? : गडावर जाण्यासाठी एसटी व खासगी वाहनांनी बाजारवाडी गावापर्यंत जाता येते. तेथून एक तासात गडावर पोहोचता येते. चिखलावडे गावाच्या बाजूनेही गडावर जाण्यासाठी रस्ता आहे. परंतु, हा मार्ग थोडा कठीण आहे.