पुणे : चित्रपटांमध्ये पात्र खरी वाटण्यासाठी अनेकदा मेहनत घेतली जाते. मात्र आगामी मुळशी पॅटर्न या मराठी चित्रपटात चक्क खऱ्या गुन्हेगारांना घेऊन गाणे चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यात काही गुन्हेगार दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून हा चित्रपट वादात अडकण्याची शक्यता आहे.मराठी अभिनेते प्रवीण तरडे यांच्या मुळशी पॅटर्न चित्रपटातील 'आरारारा खतरनाक' या गाण्यात काही खरे गुन्हेगार आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जमिनीचे भाव वाढल्याने वर्षानुवर्षे तोट्याची शेती करण्यापेक्षा ती विकून बक्कळ पैसा मिळवण्याचा हव्यास बाळगलेल्या तरुण पिढीवर हा चित्रपट बेतलेला आहे. यातील 'आरारारा' या गाण्यात तलवारीने केक कापताना चित्रीत करण्यात आलेले दृश्य कुख्यात गुन्हेगार अमोल शिंदे याच्या व्हिडिओवरुन प्रेरित आहे. याच टिजरमध्ये राखाडी रंगाचा शर्ट घातलेला विठ्ठल शेलार दिसत असून त्याच्या पाठोपाठ केशरी शर्टमध्ये अमोल शिंदे दिसत आहे.विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील बोतरवाडी येथे राहणारा असून मारणे टोळीसाठी वसुली करण्याची जबाबदारी त्याच्याकडे आहे. तशी नोंददेखील पोलिसांकडे आहे. त्यातून त्याने मुळशीत दोघांचा खून केला असून खंडणीसाठी अपहरण करण्याचा गुन्हाही त्याच्या नावावर आहे. ग्रामीण पोलिसांनी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. अमोल शिंदे हादेखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. अमोल शिंदे वातूनडे गावात सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आला होता. त्याच्याविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात ३ तर हिंजवडी पोलीस ठाण्यात १ गुन्हा दाखल आहे. यात पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खून तसेच दरोडा आणि दंगलीच्या गुन्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे खऱ्याखुऱ्या गुन्हेगारांना घेऊन चित्रीत केलेल्या या गाण्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. गणेशोत्सव काळात हे गाणे चांगलेच हिट ठरले होते. 10 दिवसात 11 लाख लोकांनी हे गाणे यु- ट्यूबवर बघितले होते.
'खतरनाक' धाडस; चित्रपटाच्या गाण्यात चक्क खरे गुन्हेगार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 10:12 PM