पौड : मुळशी तालुक्यातील प्रवाशांची चौफेर वाढती रहदारी निर्माण होत असलेले रस्त्यांचे जाळे व त्या तुलनेत एसटी महामंडळाकडून एसटीच्या फेऱ्यांचे प्रमाण व प्रवाशासाठींच्या अन्य सोयीसुविधांचे प्रमाण व्यस्त असल्याने पुणे शहराला अत्यंत जवळचा तालुका असूनही मुळशीकरांच्या नशिबी कायम उपेक्षाच आली आहे. पौड येथे १९७७-७८ साली पौड ग्रामस्थांनी सुमारे पावणेतीन एकर जागा उपलब्ध करून दिली. त्यावर एसटी महामंडळाने तत्कालीन गरजेप्रमाणे बसस्थानक उभारले. त्या इमारतीला आता २८ वर्षे होत आली आहेत.ही इमारत आता जुनी झाली असून, ती प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत कमी पडते. बसस्थानकाच्या परिसराला सुरक्षा भिंतच नसल्याने अतिक्रमणाचा व अस्वच्छतेचाही विळखा पडला. तालुक्यातून दररोज पुणे, मुंबई व कोकणात दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. तसेच पुणे शहरातही हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. पौड बस स्थानक कार्यालयातून घेतल्या गेलेल्या दीड हजार प्रवासी मासिक पासवरून ही आकडेवारी आपल्या लक्षात येईल. परंतु त्या तुलनेत शहरातून येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांचे प्रमाण फारच कमी असल्याने कामगार, विद्यार्थी यांना नाहक त्रास सहन करून खासगी प्रवासी वाहतुकीने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. कोकणात जाणाऱ्या गाड्या बहुतांशी ठिकाणी थांबतच नसल्याने त्यांचाही फारसा उपयोग होत नाही. पौडहून मुंबईला जाणारी एकमेव बस सुरू केलेली आहे.
एसटी महामंडळाकडून मुळशीकरांची उपेक्षाच
By admin | Published: April 25, 2016 2:35 AM