पुणे : दरवर्षी काेकणातील आंबा पुण्यातील मार्केटयार्डमध्ये सर्वप्रथम दाखल हाेत असताे. यंदा मात्र मुळशीच्या आंब्याने बाजी मारली आहे. पुण्यातील मार्केटमध्ये मुळशी तालुक्यातील भुकुम येथील आंबे हे विक्रीसाठी तयार झाले असून बाजारात दाखल झाले आहेत. पुण्यातील मार्केटयार्ड येथील बाजारात समितीच्या गाळ्यात आज पहिली पेटी विकली गेली. या पेटीतील आंब्यांना एक हजार रुपये प्रति डझन इतका भाव मिळाला.
आंबा केव्हा बाजारात दाखल हाेताे, याकडे सर्वांचेच लक्ष असते. मार्केटमध्ये पहिला आंबा दाखल झाल्यानंतर त्या पेटीची पुजा देखील केली जाते. दरवर्षी काेकणातील आंबे सर्वप्रथम बाजारात दाखल हाेत असतात. यंदा मात्र मुळशीच्या चंद्रकांत भरेकर यांच्या बागेतील हापूस आंबा सर्वप्रथम बाजारात विक्रीसाठी दाखल झाला आहे. त्यामुळे यंदा काेकणाच्या ऐवजी मुळशीने बाजी मारली आहे.
यंदा वातावरणातील बदलामुळे काेकणातील आंबा अद्याप बाजारात दाखल हाेऊ शकला नाही. आंब्याला सगळीकडूनच मागणी असल्याने आंबा कधी बाजारात दाखल हाेताेय याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. येत्या काही दिवसांमध्ये काेकणातील आंबा बाजारात विक्रीसाठी दाखल हाेण्याची शक्यता आहे.