लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सानेगुरुजींचे ‘आंतरभारती’चे स्वप्न साकार करणारे बहुभाषिक संमेलन लवकरच भारताचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये रंगणार आहे. सरहद संस्थेतर्फे आयोजित विश्व पंजाबी साहित्य संमेलनाचे कॉफी टेबल बुक मिळाल्यानंतर काश्मीरमध्ये संमेलन व्हावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ हिंदी साहित्यिक आणि गीतकार गुलजार यांनी पत्रातून व्यक्त केली होती. देशातील सर्व भाषांचे संयुक्त संमेलन व्हावे, अशी भावनाही त्यांनी पिंपरी-चिंचवड येथील साहित्य संमेलनात व्यक्त केली होती. हाच धागा पकडून सरहदतर्फे यंदाचे बहुभाषिक संमेलन २३ आणि २४ सप्टेंबर रोजी काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आले आहे. गुलजार यांनी संमेलनाध्यक्षपद भूषवावे, यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. संमेलनासाठी श्रीनगर हे स्थळ निश्चित करण्यात आले असून, बडगाम, टागोर हॉल यांसह तीन ठिकाणांची चाचपणी सुरू आहे. या संदर्भात जूनच्या पहिल्या आठवड्यात काश्मीरच्या राज्यपालांची भेट घेतली जाणार आहे.सरहद संस्थेतर्फे पहिले बहुभाषिक संमेलन पंजाबमधील घुमान येथे आयोजित करून हा हेतू प्रत्यक्षात उतरवण्यात आला. यंदाचे बहुभाषिक संमेलन काश्मीरमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचे ‘घुमान बहुभाषा संमेलन’ असे नामकरण करण्यात आल्याचे सरहदचे संजय नहार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. साहित्यातील भाषेच्या भिंती दूर होऊन ते एकरूप व्हावे, वाचकांना सर्व भाषांमधील साहित्याचा आस्वाद घेता यावा यासाठी सर्व भाषांंधील साहित्यिक, लेखकांनी एकत्र यावे, अशी अपेक्षा साहित्य वर्तुळातून सातत्याने व्यक्त होत असते. याबाबत माहिती देताना संजय नहार म्हणाले, ‘‘संमेलनासंदर्भात काश्मीरमधील पर्यटन विभाग आणि कल्चरल अॅकॅडमी यांच्याशी बोलणी सुरू आहेत. पर्यटन विभागाचे संचालक मेहमूद शहा यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात काश्मीरला जाऊन राज्यपाल तसेच सरकारशी अधिकृत बोलणी करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. काश्मीरमधील स्थानिक माणसाचा खराखुरा उदारमतवादी चेहरा देशासमोर यावा, हाच या संमेलनामागचा उद्देश आहे. यंदाच्या संमेलनात राष्ट्रीय ऐक्य, भाषांमधील देवाणघेवाण आदी विषयांचा परिसंवादात समावेश करण्यात येणार असून, समृद्ध विचारमंथन होईल, अशी अपेक्षा आहे.’’
श्रीनगरमध्ये होणार बहुभाषिक संमेलन
By admin | Published: May 26, 2017 6:17 AM