पुणे : पुणे विमानतळावर अनेक दिवसांपासून प्रवाशांच्या आणि त्यांना सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न उभा राहिला होता. ही समस्या सोडवण्यासाठी विमानतळ परिसरात मल्टिलेव्हल पार्किंग’ चा कामकाज सुरू करण्यात आले होते. ते काम पूर्ण होत आले असून, इलेक्ट्रिकल कामकाज पूर्ण होताच येत्या आठ दिवसात अद्ययावत पार्किंगची सुविधा सुरू होणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनातर्फे देण्यात आली.
पुणे विमानतळी पार्कींगची भीषण समस्या सोडवण्यासाठी थेट विमानतळाशी कनेक्ट (जोडणारी) मल्टिलेव्हल पार्कींग उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याचे काम आता पुर्ण झाले आहे. त्यामुळे या परिसरात उद्भवणारी पार्किंगची समस्या आता लवकरच संपणार आहे. मल्टिलेव्हल पार्कींगचे काम पूर्ण करून एप्रिल २०२२ पर्यंत सुरू करण्यात येणार होते. कोरोनामुळे हे काम लांबले. त्यामुळे हे काम सप्टेंबर २०२२ या महिन्यात खुले करण्यात येणार होते. त्यानंतरही या कामाला दोन महिने विलंब झाला असून, आता ते येत्या आठ दिवसात सुरू होणार आहे.
पार्कींगचा व्यवसायिक वापर..
चार मजली असलेल्या या ‘मल्टिलेव्हल पार्कींग’चा वापर विमानतळ प्रशासन व्यावसायिक तत्वावर देखील करणार आहे. प्रत्येक मजल्यावरील पार्किंग स्लॉट बरोबरच तेथे फूड स्टॉल आणि काही खासगी कार्यालये देखील असणार आहेत. त्यामुळे विमानतळ प्रशासनाला याद्वारे महसूल मिळणार आहे. दरम्यान विमानतळ प्रशासनाकडून उभारण्यात आलेल्या मल्टिलेव्हल पार्किंगच्या चार मजली इमारतीमध्ये पार्कींगमध्ये ओला, उबेर गाड्यांचेही पार्कींग असणार आहे. थेट येथूनच प्रवाशांना टॅक्सी बुक करता येईल. त्याचबरोबर या पार्किंगमध्ये तासाच्या दरानुसार प्रवाशांना आपल्या दुचाकी, चारचाकी येथे पार्क करता येतील. त्याचे दर शासनाद्वारे ठरवले जातील, अशी माहिती विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी दिली.
- ८० ते ८५ विमानतळावरील रोजची उड्डाणे- २३ ते २५ हजार रोजचे प्रवासी- १ हजार दुचाकी आणि १ हजार चारचाकी उभ्या करण्याची मल्टिलेव्हल पार्किंगची क्षमता
ऑनलाईन पार्किंग बुक करता येणार..
चित्रपटाच्या तिकीटाप्रमाणेच प्रवाशांना मोबाईलवरून ऑनलाईन पार्कीग बुक करता येणार आहे. त्यासाठी निश्चित करण्यात आलेले शुल्क प्रवाशांना ऑनलाईन भरता येणार आहे.