पुणे : बहुभाषिक संमेलन हे केवळ शब्दांच्या बुडबुड्यांचे नव्हे, तर सांस्कृतिक मानदंडाच्या बेरजेचे संमेलन आहे. यातून भारताचा एक नवा मानदंड प्रस्थापित होईल, जो उजव्या आणि डाव्यांच्या संघर्षातूनही होणार नसल्याचे स्पष्ट मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र आणि पंजाबचा सांस्कृतिक दुवा साधणाऱ्या ‘घुमान’ या संत नामदेवांच्या कर्मभूमीत ३ व ४ एप्रिल रोजी ‘भारतीय भाषांसाठी मराठीचा पुढाकार’ या ब्रीदवाक्यांतर्गत ‘बहुभाषिक साहित्य संमेलन’ सरहद्द संस्थेने आयोजित केले आहे. या संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण डॉ. सबनीस आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते गुरुवारी झाले. त्या वेळी अध्यक्षीय भाषणात सबनीस बोलत होते.संमेलनाचे स्वागताध्यक्ष अरूण नेवासकर, समन्वयक राजन खान, भारत देसडला, डॉ. सतीश देसाई आणि सरहद्दचे संजय नहार उपस्थित होते.डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘संत नामदेव यांची वैचारिकता भक्ती, अध्यात्म्य यापुरतीच सीमित न राहता सांस्कृतिक राष्ट्रवादाकडे नेणारी आहे. महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून गेलेले त्यांचे संतत्व हे सांस्कृतिक ऐक्याचे केंद्र बनले आहे. भाषा, जात आणि धर्म या अंगाने विभागला गेलेला भारत आता विवेकाच्या रूपाने मजबूत करायचा असेल, तर संत नामदेवांचे संतत्व आणि कर्तव्य उपयोगी पडेल. सत्य आणि संतत्वाला धर्म नसतो. म्हणूनच नामदेव हे आदर्श राष्ट्रवादाचा मानदंड होऊ शकतात.’’ कुरुपता, विद्रूपता आणि क्रौर्याविरुद्ध शांततेचा मानदंड म्हणजे संत नामदेव असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. मोरे यांनी, भारतीय भाषांचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता मराठीमध्ये आहे. आज प्रादेशिक भाषांचे अस्तित्व धोक्यात आलेले असताना मराठीने पुढाकार घेऊन इतर भाषांना स्थान देण्याचा करावा, याकडे लक्ष वेधले. संजय नहार यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)घुमान येथे होणाऱ्या बहुभाषिक साहित्य संमेलनाला साहित्य आणि कला क्षेत्रातून काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या भागामधील सुमारे १०० मान्यवर उपस्थित राहणार असून, दीड दिवस चालणाऱ्या या संमेलनाला १५० ते २०० लोक भेट देतील, असे राजन खान यांनी सांगितले. घुमानला बाबा नामदेव विद्यालय सुरू होणारघुमानच्या साहित्य संंमेलनाने काय दिले, असा प्रश्न विचारला जातो. आज पंजाब सरकारच्या पुढाकाराने घुमानला बाबा नामदेव महाविद्यालयाच्या इमारतीचे काम पूर्णत्वास आले असून, येत्या शैक्षणिक वर्षात हे महाविद्यालय सुरू होईल. तसेच शेतकऱ्यांनी भाषा भवन उभारणीसाठी दीड एकर जमीन दिली आहे, त्याचे भूमिपूजन लवकरच केले जाणार आहे. संत नामदेव एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी आम्ही केली होती; मात्र एक्स्प्रेस सुरू न होता एखादी गाडी जम्मू व्हाया बियास, पठाणकोट जाईल असा मार्ग निश्चित केला जाणार आहे, याची तरतूद पुढील वर्षीच्या रेल्वे अंदाजपत्रकात करण्याचे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले असल्याचे संजय नहार यांनी सांगितले.
बहुभाषिक संमेलन सांस्कृ तिक मानदंडाचे
By admin | Published: March 04, 2016 12:15 AM