पुणे : तुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणे नव्हे अशा कठाेर शब्दात उच्च न्यायालयाने मल्टिप्लेक्स चालकांचे कान टाेचलेले असताना अजूनही मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ चढ्या दरानेच विकले जात असल्याचे चित्र अाहे. अर्धा लिटर पाण्याची बाटली मल्टिप्लेक्समध्ये 40 रुपयांना विकली जाते. विशेष म्हणजे कायद्यातून पळवाट काढण्यासाठी प्रिमियम पॅकेज्ड पाणी असं गाेंडस नाव याला दिलं जात अाहे. त्यामुळे मल्टिप्लेक्स चालकांची मनमानी अजूनही सुरु असल्याचे दिसून येत अाहे.
मल्टिप्लेक्समध्ये पाणी तसेच बाहेरील पदार्थ नेण्यास मज्जाव करण्यात येत असल्याने उच्च न्यायालयाने मल्टिप्लेक्स चालकांचे कान टाेचले हाेते. तसेच मल्टिप्लेक्स चालक नागरिकांना खाद्यपदार्थ अात घेऊन जाण्यापासून राेखू शकत नाही, असा निर्णयही उच्च न्यायालयाकडून देण्यात अाला हाेता. राज्य सरकारने मल्टिप्लेक्समध्ये पदार्थ हे छापील किंमतीला विकण्याचा अादेश दिला हाेता. मल्टिप्लेक्स चालकांच्या विराेधात मनसेने अाक्रमक भूमिका घेतली हाेती. तरीही अनेक मल्टिप्लेक्स अजूनही नागरिकांना बाहेरील खाद्य पदार्थ अात घेऊन जाण्यास मज्जाव करतात. तर काही ठिकाणी चढ्या दरानेच खाद्यपदार्थ विकले जात असल्याचे चित्र अाहे. लाेकमतने केलेल्या पाहणीत मल्टिप्लेक्समध्ये पाचशे मिली लिटरची पाण्याची बाटली ही चाळीस रुपयांना विकण्यात येते. विशेष म्हणजे या बाटलीवर प्रिमियम पॅकेज्ड पिण्याचे पाणी असे लिहून तिची छापिल किंमत 40 रुपये केली जाते.
याबाबत बाेलताना वैधमापन विभागाचे शहरप्रमुख नितीन उदमले म्हणाले, छापील किंमतीपेक्षा अधिक दराने जर काेणी पदार्थ विकत असेल तर त्यावर कारवाई केली जाते. परंतु जर छापील किंमतच अधिक असेल तर त्यावर कारवाई करता येत नाही. किंमत ठरविण्याचा अधिकार उत्पादकाला असल्याने ताे किंमत ठरवू शकताे. परंतु सारख्याच कंपनीचा पदार्थ बाहेर वेगळ्या किंमतीला अाणि मल्टिप्लेक्समध्ये वेगळ्या किंमतीला विकला जात असेल तर कारवाई केली जाते.