पुणे - ऐन पावसाळ्यात संमेलनाचा घालण्यात आलेला घाट आणि संमेलनाच्या दरम्यानच मुंबईमध्ये जोरदार पावसाच्या देण्यात आलेल्या इशाऱ्यामुळे मुलुंडच्या नाट्य संमेलनाकडे पुण्यातील ज्येष्ठ रंगकर्मींसह रसिकमंडळी पाठ फिरविण्याची शक्यता आहे. संमेलन अवघ्या काही दिवसांवर आलेले असताना नाट्य परिषदेच्या पुणे शाखेकडे केवळ १० जणांचीच नावनोंदणी झाली आहे, तर कोथरूड शाखेकडे नोंदणीच झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. या संमेलनामध्ये सहभागी होणे हे केवळ मुंबईमधील रंगकर्मी आणि रसिकांनाच शक्य आहे. पावसाच्या दिवसामध्ये रेल्वेलाईन ठप्प होण्यापर्यंत परिस्थिती उद्भवते. या सर्वांचा विचार करून संमेलनाला न जाण्याचा विचारच अनेकांनी बोलून दाखविला आहे. मुळात संमेलनस्थळापासून आमची सोय लांबच्या लॉज किंवा हॉटेलवर केली असेल तर आम्ही जायचे कसे, असा प्रश्न पुण्यातील काही ज्येष्ठ रंगकर्मींनी उपस्थित केला आहे.येत्या चार दिवसांवर (१३ ते १५ जून) मुलुंडचे नाट्य संमेलन आले आहे. मध्यवर्ती नाट्य परिषदेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या कारकिर्दीतील हे पहिलेच नाट्य संमेलन असल्याने पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.यंदा वेगळेपण दाखवायचे म्हणून ६० तास संमेलन करण्याचे जाहीर करण्यात आले आहे; मात्र ऐन पावसाळ्यात हे संमेलन होत आहे. मुंबईचा २६ जुलैचा पाऊस अनेकांच्या स्मरणात असल्याने इच्छा असूनही पुण्यातील रंगकर्मी आणि रसिकांनी पावसाच्या काळात संमेलनाला न जाणेच पसंत केले आहे. यातच रेल्वे प्रशासनाने तिकीट बुकिंगच बंद केले आहे. त्यामुळे पुणे-मुंबई गाडीने जाण्याशिवाय पर्याय नाही; मात्र हायवेवर दरडी कोसळण्याचे प्रमाण जास्त असल्याने जाणार तरी कसे,असे काही रंगकर्मींकडून सांगण्यात आले.मागच्या वर्षीही उन्हाळ्याच्या कडक हंगामात उस्मानाबादला नाट्य संमेलन घेण्यात आले, संमेलन हे किमान वेळ आणि काळ पाहून घेतले जायला हवे तर जास्तीत जास्त लोक संमेलनाचा आस्वाद घेऊ शकतील. तर संमेलनात पुण्यातील रंगकर्मी दुर्लक्षित राहातात. काही मोजकेच व्यक्ती आणि राजकाराण्यांना त्याचा फायदा होतो. हे संमेलन आमच्यासाठी आहे असे वाटतच नाही, अशी खंत काहींनी व्यक्त केली.पुण्यातील लोक संमेलनाला जात नाहीतमुलुंडच्या नाट्य संमेलनासाठी पुण्यातून १० जणांची नावनोंदणी झाली आहे. व्हॉटसअपच्या माध्यमातून परिषदेच्या सदस्यांना निमंत्रण पत्रिका पोहोचलेली आहे. मात्र, पुण्यातील लोक संमेलनाला जात नाहीत, असा आजवरचा अनुभव आहे. त्याची कारणं माहीत नाहीत.- दीपक रेगे, प्रमुख कार्यवाह, नाट्यपरिषद पुणे शाखा
मुलुंडला नाट्य संमेलन : पुण्यातून दहा जणांचीच नावनोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 2:52 AM