पुणे : क्रुज पार्टीतील आर्यन खान ड्रग्ज (aaryan khan case) प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी (kiran gosavi) हा पुणे पोलिसांकडे दाखल असलेल्या फसवणूकीच्या गुन्ह्यात फरार असून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस काढण्यात आली आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात किरण गोसावी याच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल असून त्यामध्ये त्याला लुकआऊट नोटीस काढण्यात आली असल्याचे पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी सांगितले.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे (mumbai cruise drugs case) साक्षीदार किरण गोसावी हा चर्चेत आला. तेव्हा हे जुने प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पुण्यातील एका तरुणाने फिर्याद दिली आहे. किरण गोसावी याने आपल्या फेसबुकवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी अशी पोस्ट टाकली होती. त्याला चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून ३ लाख रुपये घेऊन किरण गोसावी याने मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने ते भारतात परत आले. त्यानंतर त्यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली होती. मात्र, त्यात तो अजूनही फरार आहे. त्यामुळे आता फरासखाना पोलिसांनी या गुन्ह्यात त्याचा शोध सुरु केला असून त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस काढण्यात आली आहे.
दिल्ली पोलीसही किरण गोसावीच्या शोधात
किरण गोसावी याने माझ्यासह अनेकांची फसवणूक केली असून दिल्ली पोलीसही त्याचा शोध घेत असल्याचे चिन्मय देशमुख याने सांगितले. चिन्मय देशमुख म्हणाले, की त्याने आम्हाला मलेशियामध्ये नोकरी देतो, म्हणून टुरिस्ट व्हिसावर पाठविले. माझ्यासह आणखी ५ ते ७ तरुण होते. नंतर वर्क व्हिसा देतो, असे सांगितले होते. मात्र, त्याने कोणालाही नोकरी दिली नाही. किरण गोसावी याच्याकडून फसवणूक झालेले हे तरुण माझ्या संपर्कात आहेत. दिल्लीमध्येही त्याने काही जणांची फसवणूक केली असल्याने दिल्ली पोलीसही त्याच्या शोधात आहेत.