विवेक भुसे-
पुणे : मुंबईतील २६ जुलै २००५ मधील पूरानंतर स्थापन झालेल्या पेंडसे कमिटीच्या शिफारशीची गेल्या १२ वर्षात पूर्णपणे अंमलबजावणी न झाल्याने अजूनही मुंबईकरांना कोठे कधी किती पाणी साचणार आहे, याची माहिती मिळू शकत नाही. ४ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर ही परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली. मुंबईकरांना गेल्या तासाभरात किती पाऊस झाला हे आता समजू शकते. पण या पावसामुळे नेमके कोणत्या भागात व किती पाणी साचेल, हे समजणे शक्य आहे, असे या कमिटीचे सदस्य आणि ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ.जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले.
या पावसाळ्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते आय फ्लोज ही मुंबईला पुराचा इशारा देणार्या प्रणालीचे उद्घाटन झाले.
पेंडसे कमिटीविषयी डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, आय फ्लोज ही प्रणाली सुरु झाली. तिची शिफारस आमच्या कमिटीने केली होती. मुंबईतील २००५ च्या पुरानंतर चितळे समितीच्या शिफारशीनुसार तत्कालीन सिंचन सचिव एम. डी. पेंडसे याच्या नेतृत्वाखाली भविष्यात अशी परिस्थिती कमी करण्यासाठी उपाय योजना सुचविण्यासाठी हायड्रोलॉजी युनिटची स्थापना केली गेली. या समितीचे सदस्य जलविज्ञान, रिमोट सेन्सिंग, समुद्रशास्त्र, हवामानशास्त्र, पूर भविष्यावाणी अशा विविध क्षेत्रांचे तज्ञ होते. कमिटीने इस्त्रोच्या मदतीने मुंबईचा उच्च रेझोल्यूशन टोपोग्राफिक नकाशा तयार करुन घेतला. जगभरात अशी कोठे सिस्टिम आहे, याचा अभ्यास केला. तेथील तज्ञांचे मार्गदर्शन घेतले. मुंबईच्या प्रत्येक क्षेत्रात सारखा पाऊस पडत नाही. मागील वेळी सांताक्रुझला विक्रमी पाऊस झाला, तेव्हा कुलाब्यात मामुली पाऊस झाला होता. यंदा कुलाब्याच्या जवळपासही सांताक्रुझला पाऊस झाला नाही. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात किती पाऊस पडतो, हे मोजण्यासाठी अॅटोमॅटिक रेनगेज बसविण्याची शिफारस केली होती. ते काम बहुतांश झाले आहे.
समितीने पडणार्या पावसाची तीव्रता लक्षात घेऊन त्यावेळची भरती आहोटीची स्थिती कशी राहील. त्यामुळे कोणत्या भागात किती पाणी साचेल, त्याचा मुंबईकरांवर काय परिणाम होईल, हे सर्व मिडियापर्यंत, लोकांपर्यंत पोहचविण्याची एक कायमस्वरुपी व्यवस्था करण्याचे सुचविले होते. त्यात केवळ हवामान विभागच नाही तर प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीचा समावेश करुन त्यांचे युनिट तयार करण्यास सांगितले होते. पावसाळा संपला की लोक विसरुन जातात. त्याप्रमाणे २००९ मध्ये आमची कमिटी गुंडाळण्यात आली.
लोकांपर्यंत ही माहिती पोहचविण्यासाठी स्वतंत्र वेबसाईट सुरु करण्याची शिफारस आम्ही केली होती. ते अजून झालेले नाही. जसा आता पावसाचा अंदाज अगोदर देता येऊ शकतो, तसेच पुढील २ ते ३ तासात कोणत्या भागात किती पाणी साचू शकेल, याचा अंदाज देता येऊ शकतो. चिन्नईमध्ये ही सिस्टिम २०१५ च्या विक्रमी पुरानंतर उभारण्यात आली आहे. त्याची शिफारस आम्ही केली होती. पण १२ वर्षाहून अधिक काळानंतर आता ही सिस्टिम उभी रहात आहे. यंदा पडलेल्या पावसाच्या वेळी ही सिस्टिम काय करत होती, हे समजले पाहिजे, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले़ .....* किती पाऊस पडणार व कोणत्या भागात हे अजूनही समजू शकत नाही.* किती पाऊस पडला, हे समजू लागले, पण कोठे पाणी साचणार हे अजूनही समजत नाही.* किमान २ ते ३ तास आधी माहिती मिळणे आवश्यक.* लोकांच्या माहितीसाठी स्वतंत्र वेबसाईट अजूनही नाही.* या पुराच्या वेळी आय फ्लोज सिस्टिम नेमके काय करत होती, हे लोकांना समजले पाहिजे.