पुणे : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाने एकला चलो रे चा नारा दिला असून महाविकास आघाडी एकत्रित लढण्याचे संकेत दिले जात आहे. मात्र आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना व काँग्रेसमध्ये सारे काही आलबेल असल्याचे म्हणता येणार नाही. त्याचे कारण म्हणजे सर्वसाधारण सभा घेण्यास शिवसेनेचा विरोध नेमका कशासाठी आहे? मुंबई महापालिकेतील गैरकारभार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून परवानगी दिली जात नाही का, असा सवाल करत काँग्रेसने शिवसेनेवर टीकेचा बाण सोडला आहे.
एकीकडे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद ही सभागृहे चालविली जात आहेत. दुसरीकडे राज्य शासन मात्र महापालिकेच्या सर्वसाधारण सभा घेण्यास परवानगी देत नाही. सर्वसाधारण सभा घेण्यास शिवसेनेचा विरोध नेमका कशासाठी आहे? मुंबई महापालिकेतील गैरकारभार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून परवानगी दिली जात नाही का, असा सवाल करत काँग्रेसने शिवसेनेवर टीकेचा बाण सोडला आहे.
पालिकेला सर्वसाधारण सभा घेण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी पुणे महापालिकेने राज्य शासनाकडे यापूर्वीच केलेली आहे. ऑनलाईन सभेमुळे गोंधळ निर्माण होतो. सभासदांना नेमके कोणते विषय सुरु आहेत अगर कोणत्या विषयांना मंजुरी मिळते आहे याबाबत माहितीच समजत नाही. विरोधी पक्षांकडूनही सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष घेण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. त्यातच कॉंग्रेसचे नगरसेवक आणि माजी गटनेते अरविंद शिंदे यांनी मंगळवारी (दि. २३) पत्रकार परिषद घेत थेट शिवसेनेवर निशाणा साधला.
सर्वसाधारण सभा घेण्यास कोणत्या आधारावर शिवसेनेचा विरोध आहे, असा प्रश्न शिंदे यांनी केला. मुंबई पालिकेतील गैरकारभार बाहेर येण्याची भीती तर सेनेला नाही ना, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज्याच्या सत्तेत भागीदार असणाऱ्या कॉंग्रेसकडूनच थेट आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेवर दबाव टाकण्याची कॉंग्रेसची रणनीती असल्याचे सांगितले जात आहे.