प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : एकीकडे ओमायक्रॉनचा शिरकाव, दुसरीकडे जानेवारीत तिसरी लाट येण्याची व्यक्त झालेली शक्यता यामुळे प्रशासनाने लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला आहे. राज्यात मुंबईमध्ये सर्वाधिक १ कोटी ६८ लाख ४३ हजार ९६६ डोस, तर पुणे जिल्ह्यामध्ये १ कोटी ३८ लाख ८९ हजार ५२६ डोस एवढे लसीकरण झाले आहे. लसीकरणात पुणे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
कोरोनाचा सामना करण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक, चौथ्या टप्प्यात सहव्याधी असलेले रुग्ण, पाचव्या टप्प्यात ४५ ते ५९ या वयोगटातील नागरिक आणि सहाव्या टप्प्यात १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. सध्या दुसऱ्या डोसचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रत्येक नागरिकाने लस घ्यावी यासाठी केंद्राच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी ‘हर घर दस्तक’ मोहीम सुरू केली. या माध्यमातून प्रत्येक घरी जाऊन, लस घेतलेल्यांची माहिती गोळा केली जात आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, पुणे जिल्ह्यात १ लाख ५७ हजार ६६४ आरोग्य कर्मचाऱ्यांचा पहिला, तर १ लाख ४० हजार ८८७ कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस झाले आहेत. अत्यावश्यक सेवेतील २ लाख ५२ हजार ५१६ कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला. तर २ लाख ३० हजार ७०८ कर्मचाऱ्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत. १८ ते ४४ या वयोगटातील ५१ लाख ८५ हजार ७५७ जणांचा पहिला डोस, तर ३० लाख ६२ हजार ३३१ जणांचे पूर्ण लसीकरण पार पडले आहे. वय वर्षे ४५ वरील २७ लाख ६९ हजार ८६५ जणांचा पहिला डोस झाला असून २० लाख ८९ हजार ७९८ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. येत्या महिन्याभरात ८० टक्क्यांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याची सूचना राज्याच्या आरोग्य विभागाने जिल्हा प्रशासनाला दिली आहे.
सर्वाधिक लसीकरणाचे जिल्हे (८ डिसेंबरच्या आकडेवारीनुसार)
जिल्हा एकूण लसीकरण
मुंबई - १,६८,४३,९६६
पुणे - १,३८,८९,५२६
ठाणे - ९९,९०,७९६
नाशिक - ५८,९२,१६२
नागपूर - ५५,४७,६८१