पुणे : शहरातील प्रक्रिया केलेले सांडपाणी शेतीला उपलब्ध करून देण्यासाठी १०० कोटी रूपये खर्च करून उभारलेला मुंढवा जॅकवेलचा प्रकल्प अखेर रविवारी सुरू करण्यात आलेला आहे. बेबी कॅनॉलच्या दुरूस्तीअभावी उद्घाटनानंतरही हा प्रकल्प ठप्प झाला होता.कॅनॉलच्या माध्यमातून २१० क्युसेक्सने पाणी शेतीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, सध्या ८० क्युसेक्सने पाणी सोडले जात आहे. त्याच्या क्षमतेमध्ये हळूहळू वाढ करत नेली जाणार आहे. मुंढवा जॅकेवल प्रकल्पात उच्च क्षमतेचे ६ पंप बसविण्यात आले असून ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहेत. पुणे शहराला वाढीव पाणी उपलब्ध करून देताना सांडपाण्यावर प्रक्रिया करून साडे सहा टीएमसी पाणी शेतीसाठी उपलब्ध करून देण्याची अट पाटबंधारे विभागाकडून घालण्यात आली होती. शेतीला पुणे महापालिकेने तातडीने सांडपाणी उपलब्ध करून याकरिता पाटबंधारे विभागाच्यावतीने सातत्याने तगादा लावण्यात आलेला होता. त्यानुसार महापालिकेने १०० कोटी रूपये खर्च करून मुंढवा जॅकवेल प्रकल्पाची उभारणी केली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.नदीतून पाणी उचलून ते जॅकवेल मार्फत बेबी कॅनॉलमध्ये सोडले जात आहे. बेबी कॅनॉलच्या माध्यमातून दौंड, इंदापूर पर्यंतच्या भागातील शेतीसाठी हे पाणी मिळणार आहे. जॅकवेल प्रकल्प तयार झाले तरी बेबी कॅनॉलची दुरूस्ती न झाल्याने पाणी सोडता येत नव्हते. उद्घाटनाच्या दिवशी आठ दिवसांमध्ये बेबी कॅनॉल दुरूस्त होईल असे सांगणाऱ्या पाटबंधारे विभागाने दुरूस्तीसाठी दोन महिने लावले.मुंढवा जॅकवेलच्या माध्यमातून नदीतून प्रक्रिया केलेले सांडपाणी उचलून साडेसतरा नळी येथील बेबी कॅनॉलमधून ते शेतीसाठी उपलब्ध करून दिले जात आहे. बेबी कॅनॉल हा ब्रिटीश काळामध्ये बांधण्यात आला आहे. तो गेल्या ४५ वर्षापासून बंद होता. त्यामुळे त्यात अनेक ठिकाणी गाळ साठला होता, तसेच काही ठिकाणी गळतीही होत होती. त्यातील कचरा व गाळ काढून त्याची दुरूस्ती करण्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत आहे. अखेर ते काम पूर्ण झाल्यानंतर बेबी कॅनॉलमधून पाणी सोडण्यास सुरूवात झाली आहे.
मुंढवा जॅकवेल प्रकल्प अखेर कार्यान्वित
By admin | Published: December 28, 2015 1:40 AM